गेल्या आठवडय़ात शॉन कॉनरी या अभिनेत्याचं निधन झालं. लहानपणी आम्ही त्याच्या नावाचा उच्चार सीन कॉनरी असा करायचो! ते राहू देत. जेम्स बाँडची भूमिका अजरामर करणारा कलाकार म्हणून अनेक जण हळहळले. वर्तमानपत्रांमध्ये आणि समाज माध्यमातून अनेकांनी त्याची छायाचित्रे, चित्रफिती, आठवणी प्रसारित केल्या.
लोकप्रिय कलाकार अनेक असतात. लोकप्रियता दीर्घकाळ टिकलेले देखील अनेक असतात. अगदी मरणोत्तर देखील वर्षानुवर्षे लोकांचं प्रेम लाभलेले कलाकार खूप आहेत. शॉन कॉनरी त्यातलाच एक. त्याचे सिनेमे बघून मीही भारावून गेलेलो.
मुळात जेम्स बाँड हे प्रेक्षकांना तास-दीडतास सगळी दु:खं विसरायला लावून अद्भुताच्या जगात नेणारं प्रकरण आहे. या सिनेमाचा नायक कधीही हरत नाही, मरत नाही. कितीही संकटे आली तरी त्यातून तो सहीसलामत सुटणार आहे हे प्रेक्षकांना ठाऊक असतं. त्यामुळे त्याचा सिनेमा बघताना मनावर ताण नसतो. शॉन कॉनरीनंतर इतर नटांनीही हा नायक साकारला. त्यांनाही या नायकाच्या वलयाचा लाभ मिळाला.
सोळाव्या वषी शाही नौदलात सेवा, नंतर नाटकांमध्ये कामे, हिचकॉकच्या चित्रपटात काम केल्यावर 1962 साली जेम्स बाँडच्या भूमिकेचा परीसस्पर्श झाला आणि यशाची चव लाभली. सात बाँडपटात त्याने कामे केली. चित्रपटांच्या कारकीर्दीत दोन वेळा ऑस्कर मिळवले.
त्याची दोन अवतरणे मजेशीर आहेत. एकात तो म्हणतो, जेम्स बाँड मला मुळीच आवडत नाही. माझ्या समोर प्रगट झाला तर त्याला मी गोळी घालीन. दुसऱया एका मुलाखतीत वृद्धत्वावर त्याला विचारले असता तो म्हणाला, मला म्हातारा झाल्यावर आल्प्रेड हिचकॉक किंवा पिकासोप्रमाणे देखणा दिसायला आवडेल. पण तो शॉन कॉनरी म्हणून देखील देखणाच होता.
आता समाजमाध्यमांच्या खोटेपणाबद्दल. शॉन कॉनरीचे निधन झाल्यानंतर त्याच्या नावे एका संगणक कंपनीला उर्मट भाषेत लिहिलेले पत्र फिरायला सुरुवात झाली. त्याने कंपनीची जाहिरात करायला नकार दिला, वगैरे. आपल्याकडच्या राजकुमारच्या उर्मटपणाचे किस्से आठवावेत तसेच हे पत्र आहे. पण आंतरजालावर शोध घेतल्यावर हे पत्र बोगस आहे हे समजते.
व्हॉट्सऍपवर रोज नित्यनवीन मजकूर, बातम्या, ध्वनी फिती, चित्र फिती येत असतात. अन्य मार्गाने खातरजमा झाल्याशिवाय मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कोणीच ठेवू नये.