प्रतिनिधी/ दापोली
मत्स्य बंदर विकास मंत्री असलम शेख यांनी एक महिन्याच्या आत सर्व प्रकारची अवैध मासेमारी बंद करण्यात येईल, असे आश्वासन मुंबईतील बैठकीत दापोलीतून गेलेल्या मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला मत्स्य व बंदर विकासमंत्री असलम शेख यांनी दिले.
अरबी समुद्रात एलईडी पर्ससीन व फास्टर बोटीच्या माध्यमातून अवैध मासेमारी होत आहे. याच्या विरोधात दापोली, मंडणगड, गुहागर मच्छीमार कृती समितीचे कार्यकर्ते गेले 5 दिवस दापोली तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंत्री असलम शेख यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी दापोलीतून मच्छीमारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत शेख यांनी अवैध मासेमारी या विरोधात आपण आता कडक भूमिका घेणार असल्याचे सांगितले. तसेच एका महिन्याच्या आत या कायद्याची कठोर अंमलबजावणी करून सर्व प्रकारची अवैध मासेमारी बंद करण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच हर्णे येथे भाडेतत्त्वावर एक फास्टर नौका उपलब्ध करून देण्यात येईल या नौकेच्या आधारे एलइडी, फास्टर व पर्ससीनच्या आधारे अवैध मासेमारी करून पळून जाणाऱया नौका पकडण्यात येतील, असे देखील त्यांनी आश्वासन या शिष्टमंडळाला दिले. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन सुरू ठेवायचे की स्थगित करायचे याबाबत लवकरच पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे या शिष्टमंडळाच्यावतीने महेंद्र चोगले यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले.