तिस्क उसगाव पीडीए प्रकल्पातील दुकानदारांना नोटीसा
वार्ताहर /उसगांव
तिस्क-उसगांव येथील पीडीए मार्केट प्रकल्पातील सर्व दुकाने एका महिन्यात खाली करण्याच्या नोटीसा दुकान मालकांना पाठविण्यात आल्या आहे. प्रकल्पाची इमारत मोडकळीस आली असून जिवीतहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्यास दक्षिण गोवा पीडीए त्याला जबाबदार राहणार नाही, असे या नोटीसीत म्हटले आहे. शिवाय नवीन प्रकल्पात दुकान मालकांना सामावून घेण्याचे त्यात नमूद केले आहे.
लीज 99 वर्षांचे, प्रकल्पाचे आयुष्य 30 वर्षे
पीडीएच्या या प्रकल्पातील काही दुकाने दुकान मालकांना थेट विकण्यात आली आहेत, तर काही दुकानांचा 99 वर्षांच्या लिजवर करार करण्यात आला आहे. करार 99 वर्षांचा असला तरी, अवघ्या 30 वर्षांतच हा प्रकल्प मोडकळीस आला आहे. दुकाने भाडेपट्टीवर चालविणाऱया काही भाडेकरुंच्या नावे नोटीसा काढण्यात आल्या आहेत. पीडीए व्यापारी संघटनेने कायदे तज्ञांशी चर्चा करुन या नोटीसांना उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकल्प 30 वर्षे जुना
राजकीयदृष्टय़ा उसगांव भाग पूर्वी फोंडा मतदारसंघात होता. सन 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्यावेळी मतदारसंघ फेररचना होऊन हा भाग वाळपई मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला. या भागाचे तत्कालीन आमदार रवी नाईक यांनी मुख्यमंत्री असताना 1992 साली या मार्केट प्रकल्पची पायाभरणी केली होती.
पीडीएची अनास्था व दुर्लक्ष
तिस्क उसगाव येथील हा प्रकल्प व काही खुली जागा पीडीएच्या मालकीची आहे. या प्रकल्पत 36 दुकाने, 900 आसन व्यवस्था असलेले भव्य सभागृह, फळ, भाजी, मासळी विक्रेत्यांसाठी जागा अशी व्यवस्था आहे. सोपो करासह, हॉलमध्ये होणारे लग्न समारंभ, व्यावसायिक नाटके, ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग अशा व्यावसायिक कार्यक्रमांमुळे पीडीएला भाडय़ापोटी बऱयापैकी महसूल मिळत होता. पण 15 वर्षांपूर्वी अचानकपणे पीडीएने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. सोपो वसूल करणेही बंद केले, हॉल भाडेपट्टीवर देणेही बंद झाले. प्रकल्पच्या वार्षिक दुरुस्तेकडे दुर्लक्ष करण्यात आले. पीडीएच्या जागेत अतिक्रमण, कचऱयाची समस्या या सर्व बाबीमुळे प्रकल्प डबघाईस आला. उसगांव पंचायत क्षेत्रात हा प्रकल्प येत असल्याने व एका चांगल्या प्रकल्पाची चाललेली दुरावस्था लक्षात घेऊन तो पंचायतीच्या ताब्यात द्यावा असा प्रस्ताव त्यावेळच्या उसगांव पंचायत मंडळाने मांडला होता. पण या प्रस्तवाला पीडीएने केराची टोपली दाखविली. पीडीएच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही वर्षांपासून स्लॅबकडील लोखंडी सळय़ांना गंज लढून स्लॅबचे तुकडे पडू लागले आहेत. या प्रकल्पाची डागडुजी करावी किंवा नवीन प्रकल्प उभारावा अशी मागणी प्रसारमाध्यमातून अनेकवेळा करण्यात आली आहे.
दुकान मालकांशी चर्चा अपेक्षीत
पीडीएने नोटीस पाठवून एका महिन्याच्या आत दुकाने खाली करण्यास सांगितले आहे. पण तोपर्यंत पुर्नवसन किंवा इतर कुठल्याच गोष्टीबाबत थेट चर्चा दुकान मालकांशी करण्यात आलेली नाही. पीडीए ही स्वायत्त संस्था आहे. नवीन प्रकल्पाची पायाभरणी कधी करणार व प्रकल्प बांधून पूर्ण कधी होणार, या प्रश्नाची उत्तरे दुकान मालकांना मिळणे गरजेचे आहे.