केळघर : प्रतिनिधी
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी व वरोशी, केळघर या नऊ गावातील एकूण २२ बंद राहत्या घरी काल मध्यरात्री घरफोड्या झाल्या असून एकाच वेळी भरवस्तीत ही घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. चोरट्यानी दरोड्यापूर्वी भागाची रेकी करूनच एव्हढ्या घरफोड्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहेत. मेढा पोलीस या चोरट्यांना शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहे.
मुख्यतः चोरट्यानी कुलूप बंद असलेल्या घरातच घरफोडी केली आहे. दिवसा गावांत टेहळणी करून टोळीच्या साहाय्याने या घरफोड्या झाल्याचे स्थानिकामधून बोलले जात आहे. मात्र चोरांबे या गावांत चोरीचा प्रयत्न फसून गावंच्या सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद झाले आहेत. आज सकाळी सातच्या दरम्यान याची माहिती मेढा पोलिसांनाच मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी घटना स्थळी भेटी देवून तपास गतिमान केला आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना बोलवले आहे.
जावळीत तालुक्याच्या पश्चिम विभागात ही एकाच रात्रीत बंद घरांची घरफोडी घडण्याचा प्रकार अनेक वेळा घडला असला तरी एकाच वेळी २१ घरफोड्या होण्याचा मोठी घटना घडली असून पोलिस प्रशासन यामुळे खडबडून जागे झाले आहे. सुदैवाने कोठेही जीवित हानी झाली नाही. ही टोळी मोठी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या चोरट्यानी बंद घरांना लक्ष केले असून त्यांच्याकडे घराची कुलुपे तोडणे, घरातील तिजोरी फोडणे यासाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यार असल्याची शक्यता आहे.
यामध्ये घरफोडी चोरांनी करंजेमध्ये दोन घरे, सावलीत दोन घरे, आसणीत सात घरे, भोगवलीत दोन घरे, पुनवडीत एक घर, केडंबेत तीन घरे, वाळंजवाडीत एक घर व वरोशीत तीन घर,केळघर येथे एक अशी २२घरे एका रात्रीत फोडून नेली आहेत. या घरफोडीमध्ये नेमका आकडा समजू शकला नसला तरी लाखोचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज आहे.
जावळी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे (रा केडंबे ) व नुकतेच सेवानिवृत्त झोलेले पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय किर्दत रा . करंजे यांचीही घरे या घरफोड्यांनी लक्ष केली आहेत. दरम्यान परिसरात घरफोड्या वाढू लागल्याने या प्रकरणी पोलिसांनी रात्र गस्तीचे प्रमाण वाढवण्याची मागणी होत असून गावोगावी प्रमुख रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे. या एकूण वातावरणामुळे पश्चिम जावळीत भितीचे वातावरण झाले आहे .