वाकरे/प्रतिनिधी
कुडित्रे (ता.करवीर) येथील गुरुवर्य डी.डी.आसगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टच्यावतीने सांगरूळ शिक्षण संस्थेचे संस्थापक व सेक्रेटरी स्व.गुरुवर्य डी.डी.आसगावकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेसह अकरा शिक्षकांना यावर्षीचा डी.डी.आसगावकर गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. जयंत आसगावकर व कार्यकारी विश्वस्त डी.जी.खाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी (दि.८) दुपारी १:३० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिक्षणप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी संस्थेच्यावतीने करण्यात आले.
पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी ट्रस्टने शिक्षण संस्थेचा पुरस्कार किसनराव मोरे एज्युकेशन सोसायटी, सरवडे (ता. राधानगरी) यांना देण्यात येणार आहे. तर, प्राध्यापक पुरस्कार प्रा.डॉ.पी.एस.पाटील (पदार्थविज्ञान व नॅनो तंत्रज्ञान प्रमुख,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार सुनंदा भागवत (आंतरभारती विद्यालय, इचलकरंजी), उच्च माध्यमिक पुरस्कार प्रा. विजया पाटील (महाराष्ट्र ज्यूनियर कॉलेज,कोल्हापूर) यांना देण्यात येणार आहे. माध्यमिक विभागातून राहुल फुटाणे (कुमार भवन,कडगाव ता.भुदरगड), दीपक शेटे (स्वा.सै.मारुती पाटील आदर्श विद्यानिकेतन मिणचे,ता. हातकणंगले), उत्तम तळवार (मालती दोशी हायस्कूल, वळीवडे ता. करवीर), अनिल हासबे (महात्मा फुले माध्यमिक, आनुर, ता.कागल), संभाजी तिबिले (उत्तुर विद्यालय,उत्तुर ता.आजरा), प्राथमिक शिक्षक सोमगोंडा चीनगोंडा (जीवन शिक्षण मंदिर मुत्नाळ, ता. गडडिंग्लज), संस्थांतर्गत विभागातून अशोक पाटील,(ग्रंथपाल, श्रीराम हायस्कूल कुडित्रे) आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार अर्जुन जरग (स.म.लोहिया हायस्कूल, कोल्हापूर) यांना देण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार पाटील हे अध्यक्षस्थानी तर, प्रमुख पाहुणे आमदार ऋतुराज पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुरस्कारप्राप्त व्यक्तीना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार असून जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांकडून पुरस्कारप्राप्त शिक्षकांची निवड केली असल्याचे प्रा.आसगावकर यांनी सांगितले.
स्व.आसगावकर यांचा स्मृतिदिन प्रबोधन कार्यक्रमाने व्हावा यासाठी संस्था व ट्रस्ट गेली अकरा वर्षे प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करत होते. ट्रस्टने गेल्यावर्षीपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षण संस्था, प्राध्यापक,मुख्याध्यापक, माध्यमिक,प्राथमिक,संस्थांतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण बारा व्यक्तींना गुरुवर्य डी.डी.आसगावकर पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
या पत्रकार परिषदेस सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, उपाध्यक्ष के.ना.जाधव, सहसचिव डी.एन.कुलकर्णी, खजानिस डी.डी.पाटील, संचालक आनंदा कासोटे, बी.आर.नाळे, बी.आर.नाळे, सदाशिव खाडे, निवृत्ती चाबूक, श्रीमती इंदूताई आसगावकर आदी. उपस्थित होते.