छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या अंगावर नेहमी रोमांच उभे करतो. शिवरायांच्या बरोबरीने त्यांच्या जिगरबाज आणि लढवय्या सेनापतींनीदेखील इतिहास अजरामर केला आहे. त्यांच्या लढवय्येगिरीने मराठय़ांच्या इतिहासाची शौर्यगाथा अखंडपणे गाजवत राहिली आहे. शिवरायांचे शूर शिपाई असणाऱया तानाजी मालुसरे यांच्या कर्तृत्वाचा इतिहास उलगडून दाखविणारा ‘तानाजी’ हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित झाला आहे.
‘आधी लगीन कोंडाण्याचं’ असे म्हणत घरामधील मंगलकार्य बाजूला ठेवून निघालेल्या तानाजीचा धडा पाठय़पुस्तकांमधून आपण प्राथमिक इयत्तांमध्ये गिरविला आहे. त्यामधूनच इतिहासातील एक पराक्रमी वीरपुरूषही तानाजी मालुसरेंची ओळख आपण जपतो. आपल्या कर्तृत्वाचा इतिहास लिहिणारे तानाजी मालुसरे हे इतिहासातील फक्त एक पान नव्हते, तर आपल्या राजासाठी समर्पण आणि प्राणत्यागाचा अध्याय लिहिणारे एक धगधगते ज्वालामुखी होते. त्यामुळे त्यांचा इतिहास हा साऱयांसाठी प्रेरणादायी आहे.
बेळगावातील स्वरूप आणि ग्लोब चित्रपटगृहात हा चित्रपट झळकला आहे. अलीकडच्या काळात झळकलेल्या काही ऐतिहासिक चित्रपटांनी आपल्यासमोर अनेक जुने प्रसंग डोळय़ांसमोर प्रत्यक्ष उभे केले. यामधून पडद्यावर का असेना परंतु इतिहासकाळाचे साक्षीदार बनण्याची संधी प्रेक्षकांना लाभली आहे. त्यामध्ये तानाजी यांच्या शौर्याचे वेगळेपण पाहण्याची संधी प्रेक्षक दवडणार नाहीत. हे नक्की!
तानाजीच्या प्रमुख भूमिकेत अजय देवगण झळकले आहेत. त्यांच्या सोबतीला काजोल, सैफ अली खान आणि शरद केळकर हे अन्य भूमिकांमध्ये दिसणार आहे. चित्रपटांचे प्रोमोज, पाहतानाच यातील थरारक प्रसंगांची प्रचिती येत आहे. त्यामुळे इतिहासाचा अनोखा पैलू या चित्रपटाद्वारे पाहण्याकरिता प्रेक्षक याला उत्तम प्रतिसाद देतील, असे सध्या दिसून येत आहे.