दर्जेदार उत्पादनाची घेतली दखल : बेळगावच्या कंपनीचे देशभर कौतुक
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. येथील नामांकित एकेपी फेरोकास्ट कंपनीला युएस येथील काटेरपिलर या संस्थेतर्फे प्लॅटिनम लेव्हल सर्टिफिकेट देण्यात आले आहे. हे सर्टिफिकेट मिळविणारी एकेपी फेरोकास्ट ही देशातील एकमेव कंपनी ठरली आहे.
चांगल्या दर्जाचे उत्पादन केल्याबद्दल कंपनीला हा बहुमान मिळाला आहे. वाघवडे रोड, मच्छे येथील या कंपनीने दर्जेदार उत्पादन तयार केल्याने याची दखल काटेरपिलर या संस्थेने घेतली. जगभरात चांगली उत्पादने बनविणाऱया कंपन्यांची यादी करून त्यांना क्रमवारीनुसार सिल्व्हर, ब्रॉन्झ, गोल्ड व सर्वोत्तम उत्पादनाला प्लॅटिनम प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते.
एकेपी ग्रुप हा 1978 पासून बेळगावमध्ये कार्यरत आहे. 2009 पासून कंपनीने व्यावसायिक उत्पादन सुरू केले. एकेपीमध्ये पूर्णपणे यंत्राद्वारे कास्टिंग तयार करण्यात येते. गुणवत्ता, पर्यावरण रक्षण व सुरक्षिततेच्या बाबतीत कंपनीने अनेक बदल केले आहेत. 2008 मध्ये एकेपी फेरोकास्ट कंपनी स्थापन करण्यात आली. कंपनीने 2020 मध्ये देशातील सर्वात वेगवान प्रगतशील कंपन्यांच्या यादीत स्थान मिळविले आहे.
सध्या कंपनी 16 देशांमध्ये उत्पादित माल निर्यात करीत आहे. कंपनीकडे 33 हून अधिक सीएनसी मशीन असून वर्षाला 30 हजार टन मालाची निर्मिती केली जाते. एकेपी ग्रुपचे चेअरमन राम भंडारे, व्यवस्थापकीय संचालक पराग भंडारे व गौतम भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या प्रगतीची घोडदौड सुरू आहे. याचसोबत एकेपी फेरोकास्ट कंपनीला डिसेंबर 2020 मध्ये ‘कैझेन विनर’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.