प्रतिनिधी/ सातारा
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ इको कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात साताऱयातील दोघांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय 24) व गणेश बाळू कोंढाळकर (22, रा. कोंढावळे, ता. वाई, जिल्हा. सातारा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिह्यातील वाई तालुक्यातील कोंढावळे येथून कोपरखैरने नवी मुंबई येथे जाण्यासाठी मारुती इको कारने 15 जण प्रवास करत होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ केए 56ा2799 हा ट्रक रस्त्याच्या कडेला पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी उभा होता. यावेळी भरधाव वेगातील कारने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी गंभीर होती की, इको कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. त्यामधील सहा जण गंभीर जखमी आहेत. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
इको कारमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेला मोठी शिकस्त करावी लागली. अपघात झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणेंसोबत डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलच्या ऍम्बुलन्स, पळस्पे वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टिमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले होते.
सदर अपघाताची भीषणता लक्षात घेत खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला आणि खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी घटनास्थळाला भेट दिली. एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. याप्रकरणी कारचालक अंकुश जंगम याने हयगयीने, बेदारकापणे, निष्काळजीपणाने भरधाव वेगात वाहन चालवून, लेनची शिस्त न पाळता अपघात घडवल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
सर्व होतेय हळहळ व्यक्त
इको कारचा चालक अंकुश राजाराम जंगम (वय 32) यांने लेनची शिस्त न पाळता, भरधाव वेगाने कार चालवल्याने हा अपघात झाल्याचे कारण प्राथमिक स्वरूपात पुढे आले आहे. पोलीस यंत्रणा या बाबत अधिक चौकशी जरी करत असली तरी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अति वेगाने कार चालवल्याने झालेल्या या भीषण अपघाताचे स्वरुप पाहता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.