बेळगाव :
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक लिग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एक्सेस इलाईट संघाने देसाई वॉरियर्स संघाचा 6 गडय़ांनी तर आनंद अकादमी ड्रॉपइन वॉरियर्सने सीसीआय ब्लू संघाचा 10 गडय़ांनी पराभव केला. साईनाथ राजोळी (एक्सेस), पीयूष गेहलोत (आनंद) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात देसाई वॉरियर्स संघाने 22 षटकात सर्व बाद 105 धावा केल्या. त्यात सुजल काकतीकरने 27, आकाश कुलकर्णीने 24, अद्वैत साठेने 14 धावा केल्या. एक्सेसतर्फे साईनाथ राजोळीने 8 धावांत 4, वृषभ पाटीलने 20 धावांत 2, वेदान्त बाडकरने 29 धावात 2 तर मणिकांत बुकिटगारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एक्सेस इलाईटने 21 षटकात 4 बाद 106 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. त्यात वृषभ पाटीलने 24, तनुष धुमाळे व मणिकांत बुकिटगार यांनी प्रत्येकी 27, अभय कुलकर्णीने 20 धावा केल्या. देसाई वॉरियर्सतर्फे आदित्य पाटीलने 29 धावात 2, वेदान्त पाटील व वैभव लोहार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात सीसीआय ब्लू संघाने 25 षटकात 9 बाद 101 धावा केल्या. त्यात तनिष्क जैनने 16, मयुरेश मंडलिकने 24 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे प्रेम पाटीलने 17 धावांत 3, पियुष गेहलोतने 15 धावांत 2, कुणाल शानभागने 16 धावांत 2 तर साईराज देसाईने 20 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी ड्रॉपइन वॉरियर्स संघाने 15.4 षटकात बिनबाद 103 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. त्यात अखिल एस. ने 8 चौकारांसह नाबाद 53 तर पीयूष गेहलोतने 2 चौकारांसह नाबाद 37 धावा केल्या. या जोडीने 103 धावांची नाबाद भागिदारी केली.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विजय जाधव, मारुती सांबरेकर, मोहन राजण्णावर, भोमाण्णा पोटे, योगेश कलघटगी यांच्या हस्ते साईनाथ राजोळी याला तर मिलिंद चव्हाण, प्रदीप तांजी, नामदेव सुळेभावी, उमा निलवरणे यांच्या हस्ते पीयूष गेहलोत याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
मंगळवारचे सामने : 1) आनंद अकादमी विरुद्ध देसाई वॉरियर्स, स. 9.20 वाजता. 2) एजे स्पोर्ट्स विरुद्ध सीसीआय ब्लू, दु. 1.30 वाजता.