क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत 16 वर्षाखालील बीपीसी चषक लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एक्सेस इलाईट संघाने साईराज हुबळी टायगर्स संघाचा रंगतदार सामन्यात केवळ 2 धावानी तर सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्स संघाने एमसीसीसी नवलू संघाचा 48 धावांनी पराभव केला. अभिषेक बालीकाई व धुव देसाई यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज हुबळी टायगर्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. एक्सेस इलाईट हुबळीने 18.5 षटकात सर्व बाद 127 धावा केल्या. प्रभु सालशेट्टी व सिद्धांत कदम यांनी 2 षटकार, 3 चौकारासह प्रत्येकी 39, ऋषिकेश राजपुतने 21 धावा केल्या. साईराज हुबळी टायगर्सतर्फे सुजल फुलदेवरेने 29 धावात 3, सुजल पाटीलने 17 धावात 2, रोहन यारिसिमीने 7 धावात 2 तर आर. एन. गवळीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज हुबळी टायगर्सने 20 षटकात 9 गडी बाद 125 धावा केल्या. हा सामना केवळ दोन धावाने एक्सेस संघाने जिंकला. साईराजतर्फे केदार उसुलकरने 1 षटकार, 7 चौकारासह 58, रोहन यारिसिमीने 5 चौकारासह 41 धावा केल्या. शेवटच्या षटकात साईराज हुबळी संघाला 5 धावांची गरज होती. यावेळी कर्णधार ऋषिकेश राजपुतने पहिले 5 चेंडू निर्धाव टाकले. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना केवळ 2 धावाच दिल्या. एक्सेस इलाईटतर्फे अभिषेक बालीकाईने केवळ 5 धावा देऊन निम्मा संघ गारद केला. त्याला ऋषिकेश राजपूतने 14 धावात 2 तर तेजस मुर्डेश्वरने 1 गडी बाद करीत सुरेख साथ दिली.
दुसऱया सामन्यात सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्सने 25 षटकात 5 बाद 179 धावा केल्या. त्यात ध्रुव देसाईने 1 षटकार, 8 चौकारासह 41 चेंडूत 62, सिद्धेश असलकरने 4 चौकारासह 60, ऋषिल दोरकाडीने 23 तर तनुष धुमालेने 10 धावा केल्या. ध्रुव देसाई व सिद्धेश असलकर या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 106 धावांची भागिदारी केली. एमसीसीसीतर्फे मनिकांत बुकीटगार, साईराज देसाई, केदार खटावकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल एमसीसीसी नवलू संघाने 25 षटकात 2 गडी बाद 131 धावा केल्या. त्यात मनिकांत बुकीटगारने 1 षटकार, 9 चौकारासह 78, अंजुम परवेझ मोरबने 36 धावा केल्या. सुपर एक्स्प्रेसतर्फे हर्ष पटेलने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे योगेश फुलदेके, प्रसाद नुगानन्नट्टी, विनोद काटने, जयसिंह राजपुत यांच्या हस्ते अभिषेक बालिकाई तर विजय पाटील, विठ्ठल गवस, महेश महाडीक, नासिर सनदी यांच्या हस्ते ध्रुव देसाई याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आजचा सामना : सहारा स्पेर्ट्स विरूद्ध अलोन स्पेर्ट्स, सकाळी 9.20 वाजता
आज महिलांचा प्रदर्शनीय सामना
भारतीय क्रिकेट मंडळाने आता महिला क्रिकेटला प्रसार सुरू केला असून भारतीय महिला संघाने विश्वकप स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले होते. बेळगावातही भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील एकदिवशीय मालिका झाली होती. आता बीसीसीआयने सर्व राज्य व जिल्हय़ातून महिला क्रिकेटला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार दीपक नार्वेकर बीपीसी क्रिकेट स्पर्धेवेळी सोमवारी दुपारी महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन संयोजकांनी करण्याचे ठरविले आहे. बेळगावातही यापुढे महिला क्रिकेटला प्राधान्य देण्यात येणार आहे. बेळगावच्या महिला क्रिकेटपटू आता झोनल विभागातही चमक दाखविताना दिसत आहेत.