कै. रत्नाकर शेट्टी स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कै. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित कै. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनदिवशी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने साई स्पोर्ट्सचा 8 गडय़ानी तर विश्रुत स्ट्रायकरने डीके लायन्सचा 3 गडय़ानी पराभव करून विजयी सलामी दिली. इंद्रसेन दानी (एक्स्ट्रीम), रोहित देसाई (विश्रुत) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती प्रसन्ना केस्ती यांनी यष्टीचे पूजन करून केले. यावेळी प्रणय शेट्टी, पुनित शेट्टी, वासीम धामणेकर, प्रशांत लायंदर आदी उपस्थित होते. पहिल्या सामन्यात साई स्पोर्ट्सने 18.3 षटकात सर्व बाद 111 धावा केल्या. त्यात मदन बेळगावकरने 24, यश कळसण्णावर, प्ररिक्षित उकुंडी यांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. एक्स्ट्रिम स्पोर्ट्सतर्फे सदानंद सोगलद व वैष्णव संघमित्र यांनी प्रत्येकी 13 धावात 3 तर इंद्रसेन दानीने 17 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एक्स्ट्रिम स्पोर्ट्सने 14.4 षटकात 2 बाद 112 धावा करून सामना 8 गडय़ानी जिंकला. त्यात संतोष चव्हाणने नाबाद 54, इंद्रसेन दानीने नाबाद 37 तर गुरूप्रसाद पोतदारने 15 धावा केल्या. साईतर्फे आनंद कुंभारने 25 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात डीके लायन्स संघाने 20 षटकात 8 बाद 164 धावा केल्या. त्यात प्रशांत लायंदरने 51 तर रवि उकलीने 43 धावा केल्या, विश्रुततर्फे रोहित देसाईने 24 धावात 3 तर रोहित पाटील, अन्वरअली दोडमनी यांनी प्रत्येकी 22 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल विश्रुत स्ट्रायकरने 19.2 षटकात 7 बाद 165 धावा करून सामना 3 गडय़ानी जिंकला. त्यात विजयकुमार पाटीलने 37, गोविंदा गावडेने 33, रोशन जवळीने 22 धावा केल्या. डीके लायन्सतर्फे हर्ष पॅट्रोटने 14 धावात 3 तर केतज कोल्हापुरेने 34 धावात 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे किरण जाधव, गणेश शेट्टी, संतोष पेडणेकर, तौशिफ बेपारी यांच्याहस्ते उत्कृष्ट झेल आकाश कटांबळे, सर्वाधिक षटकार व इम्पॅक्ट खेळाडू संतोष चव्हाण व सामनावीर पुरस्कार इंद्रसेन दानी यांना चषक देऊन गौरविण्यात आले. दुसऱया सामन्यात शेखर जाणवेकर, अमित भाते, केवन शेट्टी, नारायण चौगुले, अश्वीनकुमार निंगण्णावर, प्रताप शेट्टी यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल विजयकुमार पाटील, सर्वाधिक षटकार रोशन जवळी, इम्पॅक्ट खेळाडू गोविंदा गावडे, सामनावीर रोहित देसाई यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
शनिवारचे सामने
1) डीके लायन्स वि. झेवियर गॅलरी स 9 वा., 2) अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर वि. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स दु. 1 वा.