केवळ एकच पॅसेंजर रूळावर, चन्नम्मा-शेडबाळ रेल्वेलाच पास ग्राहय़, प्रवासी अडचणीत
प्रतिनिधी /बेळगाव
पॅसेंजर सुरू करण्यास नैर्त्रुत्य रेल्वे उदासीन आहे, तर मध्य रेल्वे परवानगी देण्यास तयार नाही. यामध्ये प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. नैर्त्रुत्य रेल्वेकडून मासिक पास देण्यात येत असला तरी तो पास एक्स्प्रेसला चालत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. चन्नम्मा एक्स्प्रेस व शेडबाळ पॅसेंजर वगळता इतर रेल्वेंना पास चालत नाही. यामुळे मिरज ते हुबळी दरम्यान पॅसेंजर सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
बेळगाव शहर हे जिल्हय़ाचे मुख्य ठिकाण असल्यामुळे व्यवसाय, नोकरी, उद्योगधंद्यांसाठी जिल्हय़ातून अनेक नागरिक शहरात येतात. रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चाचा व सुरक्षित असल्यामुळे मासिक पास काढून प्रवास करणाऱयांची संख्याही मोठी आहे. लोंढा, कॅसलरॉक, खानापूर, घटप्रभा, गोकाक, रायबाग, चिंचली, उगार या परिसरातून अनेकजण दररोज शहरात येतात. अशा व्यक्ती रेल्वेकडून मासिक पास घेऊन रेल्वेचा प्रवास करतात.
कोरोनाच्या काळात ठरावीक रेल्वेच धावत असल्यामुळे मासिक पास बंद ठेवण्यात आला होता. बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर सुरू झाल्यानंतर पुन्हा मासिक पास देण्याची सुविधा करण्यात आली. मासिक पास देण्यात येत असला तरी त्यावर ‘आरक्षित रेल्वे अथवा कोच’मध्ये परवानगी नाही, असा उल्लेख करण्यात आला आहे. बऱयाचवेळा मासिक पासधारक कोणत्याही एक्स्प्रेसमध्ये चढतात. टीसीकडून कारवाई केल्यानंतर त्यांना दंडही भरावा लागतो. त्यामुळे पास काढूनदेखील नाहक आर्थिक भुर्दंड प्रवाशांना भरावा लागत
आहे.
काऊंटरवर एक तर ऑनलाईनवर दुसराच नियम
रेल्वे विभागाच्या तिकीट काऊंटरवर पास घेतल्यानंतर त्यावर शिक्का मारला जात आहे. परंतु यूटीएस ऍपमधून पास काढल्यानंतर असा कोणताही त्यावर शिक्का येत नसल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. सध्या पॅसेंजर सुरू नसल्यामुळे सर्वच एक्स्प्रेसना मासिक पास वापरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. दररोज 300 ते 400 प्रवासी मासिक पासने बेळगाव ते उगारपर्यंत ये-जा करतात. त्यामुळे रेल्वे विभागाने या प्रवाशांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
बेळगावहून शेडबाळला जाण्यासाठी केवळ 1 पॅसेंजर उपलब्ध आहे. ही पॅसेंजर सकाळी 8 वाजता बेळगावमधून निघून सुळेभावी, सुळधाळ, पाच्छापूर, पारकनट्टी, गोकाक रोड, घटप्रभा, बागेवाडी, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द व शेडबाळला पोहोचते. ज्या वेळेत प्रवाशांना कामासाठी बेळगावला यायचे असते त्याच वेळेत ही रेल्वे शेडबाळला जाते. त्यामुळे मिळेल त्या एक्स्प्रेसमध्ये बसून प्रवासी प्रवास करीत आहेत. त्याचबरोबर चन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये पासधारकांना प्रवेश दिला जात असल्यामुळे प्रवाशांची सोय होत आहे. याचप्रमाणे इतर एस्क्प्रेसमध्येही सवलत देणे सोयीचे ठरणार आहे.