वाहनधारकांची डोकेदुखी वाढली : डागडुजी करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील गांधीजी सर्कलनजीक रस्त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे. येथील क्लब रोडवरील संपूर्ण रस्त्याचे क्हाईट टॅपिंग करण्यात आले आहे. मात्र व्हाईट टॅपिंग केलेल्या रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडले असून या खड्डय़ात वाहने अडकून बसत आहेत. त्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली असून येथील खड्डय़ांची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर वाहनधारकांची नेहमी वर्दळ असते. क्लब रोडमार्गे गणेशपूर, बेन्नाळी, बेळगुंदी यासह अनेक गावांना ये-जा करण्यासाठी वाहनधारक या मार्गाचा वापर करतात. मात्र येथील पडलेल्या खड्डय़ांमुळे सदर मार्गावरून जाणे मुश्कील बनले आहे. या ठिकाणी पथदीपाअभावी रात्रीच्या वेळीदेखील वाहनधारकांना या मार्गावरून जीव मुठीत धरूनच जावे लागत आहे.
एक खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना दुसऱया खड्डय़ात लोटांगण घालावे लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाठीमागून येणाऱया वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे येथील खड्डय़ांची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून करण्यात येत आहे.