म्हापसा पालिकेच्या खास बैठकीत विविध ठराव संमत
प्रतिनिधी/ म्हापसा
एक तृतीयांश फेरी विक्रेत्यांना घेऊन म्हापसा बाजारपेठ टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल. एकूण 312 फेरी विक्रेत्यांना यात सामावून घेण्यात येईल. शुक्रवारचा पुरुमेंतचा बाजार हळदोणा टेंपो स्थानक, मिलाग्रीस चर्चच्या पार्कींग जागेत भरविण्यात येईल. म्हापशातील गणेश मूर्ती तार नदीत विसर्जित न करता त्यासाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल. गुरे उचलण्याची गाडी गोशाळेला सुपूर्द करावी. फेरी विक्रेत्यांना गणवेश लागू करण्यात येईल असे विविध महत्त्वाचे ठराव म्हापसा पालिकेच्या खास बैठकीत एकमतांनी संमत करून घेण्यात आले. दरम्यान आजची खास बैठक बंद दरवाजाच्या आत घेतल्याने म्हापशात हा एक चर्चेचा विषय ठरला. पत्रकारांनाही दोन तास तात्कळत सभागृहाच्या बाहेर थांबावे लागले.
म्हापसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. यावेळी नगरसेवक तथा आमदार जोशुआ डिसोजा, एटिओ भानुदास नाईक, पालिका अभियंता आदी नगरसेवक उपस्थित होते.
30 टक्के फेरी विक्रेत्यांना सामावून घेणार
लॉकडाऊनच्या काळात म्हापसा बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती हे लक्षात घेऊन एक तृतीयांश 30 टक्के फेरी विक्रेत्यांना घेऊन म्हापसा बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय म्हापसा नगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. यात सुके मासे विक्रेते, स्थानिक नागरिक आपले सामान घेऊन बसतात त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच पुढची रांग जी बसविण्यात आली आहे त्याप्रमाणे बाजारात अवघ्यानाच स्थान देण्यात येणार आहे. एबी नार्वेकर, ढेकणे मागे, सांगोडकर दुकानामागे ही जागा दुचाकी पार्कींगसाठी राखीव ठेवण्याचे या बैठकीत ठरले. म्हापसा शकुंतला जवळील पूर्णतः रस्ता दोन्ही बाजूंनी खुला ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
पुरोमेंताचा बाजार भरण्यासाठी हळदोणा टॅक्सी टॅम्पो स्थानक तसेच मिलाग्रीस चर्चची पार्कींग जागा संबंधित चर्च अधिकारी वर्गाकडून रितसर परवानगी घेऊन वापरण्यात येणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले. हे फक्त शुक्रवारच्या बाजारासाठीच मर्यादित असणार आहे.
गणेश विसर्जनासाठी नवीन जागा
म्हापसा तार नदी प्रदूषित झाली असून येथे गणेश मूर्ती विसर्जन करणेही धोक्याचे व कठीण बनले होते. हिंदू भाविकांच्या देवाची विटंबना होऊ नये हे लक्षात घेऊन गणेश विसर्जन स्थळासाठी म्हापसा पालिका खास जागा तात्पुरती पाहणार आहे. विशेष म्हणजे सध्या कलींगड विक्री केली जाते त्याच्या पुढे असलेल्या शेतीत गणेश विसर्जनासाठी खास सोय करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी दिली. ऐनवेळी ही सोय केली जाईल. अलीकडेच म्हापसातील एक शेतकरी संजय बर्डे यांनी म्हापशातील गणेश मूर्ती विसर्जन तार नदीत न करता अन्यत्र करावेत अशी मागणी त्यांनी केली होती.
सोपो धारकाला 1 जूनपासून नवीन करार
म्हापसा बाजारपेठेतील सोपो धारकाने पे पार्कींग व मार्केटमधील सोपो मिळून 1 कोटी 20 लाखाना घेतला होता त्याची कारकीर्द एप्रिलमध्ये संपुष्टात आली होती मात्र लॉकडाऊनमुळे दोन महिने बाजारपेठेत कुणीही न आल्याने सोपो धारकाला बरेच नुकसान सोसावे लागले. हे लक्षात घेऊन सोपो धारकाने आपल्यास रिलेक्शेशन द्यावे अशी मागणी पालिकेकडे केली होती. त्याची दखल घेत त्यांचा करार 1 जूनपर्यंत करावा त्यानुसार त्यांनी करार करावा असे एकमताने ठरविण्यात आले. पाठीमागचे दोन महिने सोडून पुढील वर्षासाठी नव्याने करार जून पासून सुरू करावा असे ठरविण्यात आले. वेस्ट मॅनेजमेंटचा बाय लॉ चर्चेस आला असता तो पुढील अभ्यास करणअयासाठी पालिका संचालनालयाकडे पाठवून देण्याचे यावेळी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी पत्रकारांना सांगितले.
करमाफिचा निर्णय पालिका संचालनाकडे
लॉकडाऊनमुळे बाजारपेठ पूर्णतः बंद आहे त्यामुळे कुणालाच बाजारपेठेत व्यवसाय करायला मिळाला नाही. म्हापसा व्यापाऱयांनी या कालावधीतील कर माफ करावेत अशी मागणी पालिकेकडे केली असता यावर अंतिम निर्णय घ्यावा यासाठी ही फाईल पालिका प्रशासकाकडे पाठवून देण्याचा निर्णय झाला.
गुरे उचलण्याची गाडी गोशाळेला
म्हापसा पालिकेची जी गुरे उचलण्याची गाडी आहे ती गोशाळेच्या ताब्यात देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. जेव्हा पालिकेला या गाडीची गुरे उचलण्यासाठी गरज भासेल त्यावेळी ही गाडी पुन्हा गोशाळेकडून आणण्यात येईल अशी अट घालण्यात आली आहे.
312 फेरी विक्रेत्यांना सामावून घेणार
पत्रकारांशी बोलताना नगरसेवक संदीप फळारी म्हणाले की, म्हापसा बाजारपेठ फेरी विक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने सामावून घण्यात येणार आहे. पार्कींग सोशल डिस्टन्सी ठेवून करण्यात येणार आहे. बाजारपेठेत 20 दुकाने खाली आहेत त्यांची निविदा काढून त्याची पाठणी केली जाईल. प्रत्येक फेरी विक्रेत्याला युनिफॉर्म दिला जाईल. जे के वाईन, साळगावकर फार्मसी, पेराडाईस फार्मसी येथे फेरी विक्रेत्यांना बसविण्यात येणार आहे. 312 फेरी विक्रेत्यांना येथे सामावून घेण्यात येणार असून त्यात स्थानिकांचा समावेश असेल. टाऊन बेडींग कमिटी याकडे लक्ष ठेवून असेल. या सर्वांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
बॉक्स करणे
पत्रकारांना 2 तास तात्कळत सभागृहाबाहेर ठेवले
म्हापसा नगरपालिकेत सभागृहात जागा कमी आणि 20 नगरसेवक यामुळे सोशल डिस्टन्सीचे फोटो व्हायरल होमार याची दक्षता घेत नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी सभागृहाचा मुख्य दरवाजा बंद करून ही बैठक घेतली. विशेष म्हणजे दारावर कर्मचारी वर्ग ठेवून पत्रकार आतमध्ये येणार नाही वा फोटो काढणार नाही याची काळजी घेतली. सकाळी 11 वा. सुरू झालेली बैठक 1 वा. संपली मात्र पत्रकारांना 12 वा. बैठक संपेल असे सांगून 1 वाजेपर्यंत दरवाजा बाहेर तात्कळत ठेवले व बाहेर आल्यावर माफीही मागितली.
कामगाराअभावी घरोघरी कचरा पडून
सध्या कोविडमुळे लॉकडाऊन असल्याने कामगार वर्गही आपापल्या गावी जात असल्याने जे घरोघरी जाऊन पालिकेचे कर्मचारी कचरा गोळा करतात ते डेली व्हेजीस कामगार दांडा मारू लागल्याने गणेशपुरी तसेच आदी ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याचे नगरसेवक संजय मिशाळ यांनी पालिकेच्या नजरेस आणून दिले. डेली व्हेजीस कामगारांना बाहेर 1500 हजार मिळत असल्याने ते खासगी कामाला वळत असल्याचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी स्पष्ट केले. मात्र कायमस्वरूपी कामगार आपली डय़ुटी बजावत असल्याचे ते म्हणाले. पावसाळय़ापूर्वीची कामे करण्यासाठी दररोज रोजगारीवर असलेले कामगार धाव घेत असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.