सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना’.. ही म्हण आपण शाळेत असल्यापासून ऐकत आहोत. हस्ताक्षराबद्दल अशा म्हणी का प्रचलित आहेत, हे चांगल्या हस्ताक्षराचे महत्त्व पटल्यावर आपल्याला कळेल. पूर्वीच्या लोकांनी हस्ताक्षराचे महत्त्व जाणून सहज सोप्या शब्दात ते आपल्यासमोर मांडले होते, जुन्या काळातील कागदपत्रे पाहिल्यास हे कळते. आजच्या पिढीला सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व कळणे व पटणे गरजेचे आहे.
सुंदर हस्ताक्षराचे अनेक फायदे आहेत. आपण जेव्हा ठरावीक वेळात सुबक अक्षर काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला एकाग्रतेची सवय लागते व वेळेचे नियोजन करण्याची सवय लागते. वेळेचे महत्त्व कळते. आजच्या धावपळीच्या जीवनात वेळ आपल्यासाठी मौल्यवान आहे. त्याचे नियोजन जर आपण असे सोप्या पद्धतीने अक्षरांच्या माध्यमातून शिकवू शकलो तर मुलांना त्याची लहानपणापासून सवय लागेल.
आजचे युग हे मोबाईल व कॉम्प्युटरचे आहे. त्याच्या वापरामुळे आपले हस्त लिखाण कमी झाले आहे. त्यामुळे अक्षर सुंदर हवे असेल, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ‘अक्षरावरून माणसाची पारख करता येते’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नीटनेटकेपणा, शिस्त, कलात्मकता, असे कितीतरी गुण एखाद्याचे अक्षर पाहून आपल्या लक्षात येतात. सुंदर हस्ताक्षरासोबत शुद्ध भाषाही तितकीच आवश्यक आहे.
चांगल्या हस्ताक्षरासाठी…
- अक्षरे शांतपणे आणि एकाग्रतेने काढावीत.
- हस्ताक्षर गोल आणि वळणदार काढावे.
- दोन शब्दांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे.
- प्रतिदिन दुरेघी वहीत 5 ओळी तरी शुद्धलेखन लिहावे.
- चांगले हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे.
- लिहिण्यासाठी शक्मयतो निळय़ा शाईची लेखणी (पेन) वापरावे.