एआयएमआयएम प्रमुख ओवैसी यांचे विधान ः भाजपकडून शरसंधान
हिजाबचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. कर्नाटकातून सुरू झालेला हिजाब वाद मोठा राजकीय मुद्दा ठरला आहे. याचदरम्यान एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी एक ट्विट करत ‘एक दिवस एक हिजाब घातलेली पंतप्रधान होईल’ असे म्हटले आहे. ओवैसी हे सातत्याने हिजाब परिधान करण्याच्या स्वातंत्र्याची बाजू उचलून धरत आहेत. ओवैसी यांनी या पोस्टसह एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
आमच्या मुलींनी हिजाब परिधान करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना कोण रोखतो हे आम्ही पाहू. हिजाब, नकाब घालून कॉलेजमध्ये जातील, जिल्हाधिकारी, उद्योजिका होतील. एक दिवस या देशाची पंतप्रधान एक मुलगी हिजाब घालून होणार हे लक्षात ठेवा असे ओवैसी यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.
भाजपकडून प्रत्युत्तर
भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी ओवैसी यांच्या विधानावर निशाणा साधला आहे. ओवैसी यांनी स्वप्नरंजनातच रहावे. मुस्लीम महिलांना बंधनात ठेवण्याची ही त्यांची कट्टरवादी मानसिकता आहे. परंतु आता मुस्लीम मुली आणि महिला पुढे जात असून स्वावलंबी होत आहेत. मोदी सरकारने त्यांना तीन तलाकपासून मुक्ती मिळवून दिली आहे. ओवैसी यांच्या भुलथापांना महिला आता बळी पडणार नसल्याचे त्रिपाठी यांनी म्हटले आहे.