संजीव खाडे / कोल्हापूर
कोरोनाच्या वाढत्या संकटाला सामोरे जाण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने आपली आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याची तयारी सुरू केली आहे. या तयारीचाच एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणून कोरोनाच्या रूग्णाला लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मितीच आता महापालिका स्वतः करणार आहे. यासाठी तब्बल 82 लाख रूपये खर्च ऑक्सिजन जनरेशन प्लांट (ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प) उभारण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये या प्लांटची उभारणी करण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रूग्णाला लागणाऱ्या ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित झाले. त्या काळात ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक कोरोना रूग्णांना जीव गमवावा लागला होता. कोरोनाचे रूग्ण वाढल्यानंतर ऑक्सिजनची मागणीही वाढते हा गतकाळातील अनुभव पाहून महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहरात स्वतंत्र असा ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही महापालिकेच्या प्रयत्नांना साथ दिली. जिल्हा नियोजन समितीतून तब्बल 82 कोटी रूपयांचा निधी या प्लांटसाठी मंजूर करण्यात आला.
प्लांट उभारणीसाठी आयसोलेशन हॉस्पिटलमधील जागा निवडण्यात आली. निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली. महिन्याभरात हा प्लांट उभारून तो कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रकाराचा एक प्लांट गडहिंग्लजमध्ये उपजिल्हा रूग्णालयात गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी उभारण्यात आला होता. त्याचा लाभ गडहिंग्लजसह आजरा आणि चंदगड तालुक्यांतील कोरोनाच्या रूग्णांना झाला होता. कोल्हापूर महापालिकेचा हा प्लांट हा जिल्हा दुसरा ऑक्सिजन जनरेटर प्लांट ठरणार आहे.
हॉस्पिटमध्येच ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा
या प्लांटमुळे आयसोलेशन हॉस्पिटलमधील रूग्णांसाठी बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर आणावी लागणार नाहीत. हॉस्पिटमध्ये ऑक्सिजन तयार करून तो 71 ऑक्सिनेटेड बेड आणि 6 आयुसीयु बेडना पाईपलाईनव्दारे पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर आणावे लागणार नाही. वाहतूक, रिफिलिंग आणि मनुष्यबळाची बचत होणार आहे. हे या प्लांटचे फायदे आहे.
भविष्यात बॉटलिंग प्लांटची उभारणी
भविष्यात कोरोनाचे रूग्ण कमी झाल्यास या ऑक्सिजनचा जनरेशन प्लांटच्या जागी बॉटलिंग प्लांट उभारण्याचाही महापालिकेचा मानस आहे. बॉटलिंग प्लांटमुळे महापालिकेच्या पंचगंगा, सावित्रीबाई या हॉस्पिटमध्येही ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. त्यासाठी बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर विकत आणावी लागणार नाही, अशी माहिती उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.
असा आहे ऑक्सिजन जनरेशन प्लांट
हवेतील ऑक्सिजन शोषून घेतल्यानंतर तो प्युरिफाय (फिल्टर) केला जातो. त्यानंतर त्याचे कॉन्स्ट्रटेशन 92 टक्क्यांपर्यंत वाढविले जाते. त्यानंतर ऑक्सिजन प्रेशरने पाईपलाईनव्दारे हॉस्पिटलमधील रूग्णांसाठी बेडपर्यंत पुरविण्यात येतो.
ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधून दररोज 150 सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होईल. त्याचा लाभ थेट आयसोलेशन हॉस्पिटलमधील गरजू रूग्णांना होणार आहे. -डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक कोमनपा |