जिल्हय़ातील स्थिती, रविवारी मिळाला दिलासा
प्रतिनिधी/ बेळगाव
रविवारी दिवसभरात बेळगाव येथील एकाही संशयिताचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. दुपारी व सायंकाळी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये राज्यातील केवळ तीन रुग्णांचा उल्लेख असून मंगळूर व गुलबर्गा येथील हे रुग्ण आहेत. बेळगाव जिल्हय़ातील 1083 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जिल्हय़ातील 3 हजार 166 जणांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. यापैकी 1083 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये तर अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 47 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
जिल्हय़ातील 908 जणांनी चौदा दिवसांचे तर 1128 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. तर आतापर्यंत जिल्हय़ातील 2222 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून 1320 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 54 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत.
सहा जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाला आणखी 826 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. आता बेळगावलाच तपासणी सुरू झाली आहे. सोमवारपासून तपासणीला वेग येणार आहे. प्रशासनाने संशयितांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले असून बेळगाव शहरातील वेगवेगळय़ा लॉजमध्ये त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
मोबाईल ऍपद्वारे ठेवणार लक्ष
इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या 121 जणांना रविवारी घरी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली आहे. त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यापुढे त्यांनी 14 दिवस घरी क्वारंटाईनमध्ये रहायचे आहे. घरात राहणाऱयांवर मोबाईल ऍप व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. याबरोबरच आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करीत आहेत. आरोग्य, महसूल, पोलीससह विविध खात्यातील कर्मचाऱयांच्या मेहनतीमुळे चांगले परिणाम दिसून येत असल्याचेही जिल्हाधिकाऱयांनी म्हटले आहे.