सांगली / प्रतिनिधी
दाजी पाटलोजी विद्यालयातील मृत शिपायाच्या कुटुंबाला कुटूंब निवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एक हजाराची लाच स्वीकारताना सांगली येथील माध्यमिक शिक्षण विभागाचा क्लार्कसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली.
क्लार्क पोपट पडळकर याच्यासह शिक्षण विभागाचा निवृत्त क्लार्क विश्वास गणपती पाटील आणि खानापूर तालुक्यातील दाजी पाटलोजी विद्यालयाचा क्लार्क सुभाष पोतदार अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. विश्राम बाग पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाजी पाटलोजी विद्यालयातील शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचा गतवर्षी अपघाती मृत्यू झाला. त्याच्या पत्नीला कुटूंब निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यासाठी क्लार्क पडळकर हा एक हजाराची लाच मागत असल्याचे पोतदार याने सांगितले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात पोलिसांनी सापळा रचला होता. पोतदार आणि पडळकर यांनी लाच मागितली आणि ती निवृत्त क्लार्क पाटील स्वीकारत असताना पोलिसांनी या तिघांनाही अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे आणि प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.