आमदार अनिल बेनके : आश्रय फौंडेशन आश्रमात एड्सबद्दल जनजागृती कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव परिसरातील तीन हजारहून अधिक एचआयव्ही बाधितांच्या मदतीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करून त्यांना मदत मिळवून देऊ, असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
दरवषी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा, असे जागतिक राष्ट्र संघाने (यूनो) घोषित केले आहे. याच दिवशी जायंट्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षा शायना एन. सी. आणि युनिट संचालक मदन बामणे यांचा वाढदिवस असल्याने या दिनाचे औचित्य साधून जायंट्स मेनच्यावतीने महांतेशनगर येथील एचआयव्ही बाधित मुलींच्यासाठी काम करणाऱया आश्रय फौंडेशन या आश्रमात एड्सबद्दल जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
एचआयव्ही बाधितांच्या संपर्कात आल्याने त्याचा संसर्ग होत नाही. त्यामुळे जनतेने अशा व्यक्तींना मानसिक बळ देण्याचे काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर आमदार अनिल बेनके, जायंट्स मेनचे अध्यक्ष संजय पाटील, आश्रय फौंडेशनच्या सफला नागरत्ना, जायंट्स सखीच्या अध्यक्षा नीता पाटील उपस्थित होत्या.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत युनिट संचालक मदन बामणे यांनी केले. त्यानंतर सफला नागरत्ना यांनी एड्सबद्दल असणारे समज-गैरसमज याबद्दल आणि आश्रय फौंडेशनच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली.
संजय पाटील, नीता पाटील, ज्योती अनगोळकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
आश्रमातील मुलींच्या हस्ते केक कापून जायंट्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षा शायना एन.सी. यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचवेळी जायंट्स मेनचे संचालक राहुल बेलवलकर यांची कन्या सान्वी हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एड्स दिनादिवशीच एड्सबाधितांच्या सानिध्यात लहान बाळासोबत त्यांचा संपूर्ण परिवार सहभागी झाला होता.
या कार्यक्रमाला जायंट्स मेन आणि जायंट्स सखीच्या सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.