‘मेक इन इंडिया’ला मोठे यश : ‘एएलएच एमके-3’ निर्यातीचा करार पूर्णत्वास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रगत हलक्या हेलिकॉप्टरच्या (एएलएच एमके-3) निर्यातीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) मॉरिशस सरकारसोबत करार केला आहे. या करारानुसार आता एएलएच एमके-3 हेलिकॉप्टर्स मॉरिशसच्या पोलीस दलात दाखल होणार आहेत. मॉरिशस सरकार सध्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनिर्मित ‘एएलएच’ आणि ‘डीओ-228’ विमाने वापरत आहे. आता या नव्या करारामुळे एचएएल आणि मॉरिशस सरकारमध्ये तीन दशकांहून अधिक काळ असलेले द्विपक्षीय व्यावसायिक संबंध अधिक दृढ झाले आहेत. हा करार भारत सरकारच्या मैत्रीपूर्ण देशांना संरक्षण निर्यातीला चालना देण्याच्या संकल्पनेशी सुसंगत आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे निर्मित, हेलिकॉप्टरने भारत आणि परदेशातील नैसर्गिक आपत्तींच्या वेळी अनेक बचाव मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आतापर्यंत अशा 335 हून अधिक एएलएच हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरची सेवाक्षमता सुनिश्चित करण्यासाठी एचएएल मॉरिशसला तांत्रिक सहाय्यही करणार आहे.
भारताने आता संरक्षण निर्यात वाढवण्याच्या योजनांवर लक्ष केंद्रीत केले असून त्यात सातत्याने यश मिळत आहे. अलीकडेच, फिलिपाईन्सने भारतीय ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडच्या 2779 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. हा प्रस्ताव फिलिपाईन्स नौदलाच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या पुरवठय़ाशी संबंधित होता. फिलिपाईन्स सरकारच्या संरक्षण विभागाने या कराराची सूचना त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) आणि ब्रह्मोस एरोस्पेस गेल्या काही महिन्यांपासून हे क्षेपणास्त्र मित्र देशांना निर्यात करण्यात गुंतले होते. ब्रह्मोसच्या निर्यातीमुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी मोहिमेला मोठी चालना मिळणार असून अन्य देशांकडूनही क्षेपणास्त्रासाठी मागणी अपेक्षित आहे.