थायलंड ओपन सुपर 1000 बॅडमिंटन – साई प्रणीतला कोरोनाची लागण, श्रीकांतची माघार
वृत्तसंस्था/ बँकॉक
भारताच्या एचएस प्रणॉयने टोयोटा थायलंड ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक सातव्या मानांकित इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्तीला पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली.
टॉपटेनमधील माजी खेळाडू असलेल्या प्रणॉयने एका गेमची पिछाडी भरून काढत सहाव्या मानांकित ख्रिस्तीवर सव्वातासाच्या रोमांचक लढतीत 18-21, 21-16, 23-21 अशी मात केली. चार प्रयत्नांत पहिल्यांदाच प्रणॉयने त्याला हरविण्यात यश मिळविले आहे. गेल्या आठवडय़ात मलेशियाच्या ली झी जियाविरुद्ध संघर्ष करूनही प्रणॉयला विजय मिळविता आला नव्हता. त्याची भरपाई त्याने या सामन्यात ख्रिस्तीविरुद्ध केली. 28 वर्षीय प्रणॉयला दोन महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून सावरताना त्याला बराच संघर्ष करावा लागला आणि मानसिक ताणही सहन करावा लागला होता. त्याची पुढील लढत मलेशियाच्या डॅरेन ल्यूविरुद्ध होणार आहे.
साई प्रणीत पॉझिटिव्ह, श्रीकांतची माघार
पुरुष एकेरीत प्रणॉय व समीर वर्मा हे दोनच भारतीय खेळाडू उरले आहेत. बे. साई प्रणीत व किदाम्बी श्रीकांत यांना या स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले आहे. यापैकी साई प्रणीतला कोरोनाची लागण झाल्यामुळे श्रीकांतलाही माघार घ्यावी लागली आहे. माजी जागतिक अग्रमानांकित किदाम्बी श्रीकांत व प्रणीत एकाच रूममध्ये राहत असल्याने विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या (बीडब्ल्यूएफ) नियमावलीनुसार त्याला स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले. मंगळवारी रात्री बीडब्ल्यूएफने साई प्रणीतला कोरोनाची बाधा झाल्याचे आणि या स्पर्धेतून तो माघार घेत असल्याचे जाहीर केले. सोमवारी त्याची पीसीआर चाचणी घेण्यात आली होती. पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे साई प्रणीतला आता 10 दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागणार आहे. त्याच्या सोबत राहिल्यामुळे श्रीकांतला मात्र शिक्षा सहन करावी लागली. त्याने पहिल्या फेरीत थायलंडच्या सिथिकोम थम्मासिनचा 21-11, 21-11 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली होती. गेल्या आठवडय़ातही त्याने पोटरीचे स्नायू दुखावल्यानंतर दुसऱया फेरीतून माघार घेतली होती. सोमवारच्या चाचणीत तो व अन्य भारतीय खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र नियमानुसार त्याला आता सेल्फ क्वारंटाईनमध्ये रहावे लागले आहे. मागील आठवडय़ातही सायना नेहवाल व एचएस प्रणॉय कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. पण नंतरच्या चाचणीत निगेटिव्ह आल्याने त्यांना थायलंड ओपन स्पर्धेत खेळण्यास परवानगी देण्यात आली होती.