वृत्तसंस्था / नवी दिल्ली
खासगी क्षेत्रात कार्यरत असणारी देशातील दिग्गज बँक म्हणून ओळख असणाऱया एचडीएफसी बँकेकडून कोरोना संसर्गाच्या वाढत्या वेगामुळे बँकेने देशातील जवळपास 19 शहरांमध्ये गाडीवर एटीएम सेवा हा उपक्रम सुरू केला आहे. सदरच्या एटीएमवर ग्राहकांना मास्क व सॅनिटाइझ केले असल्यास लगेच पैसे काढता येणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे.
बँकेने या संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ सादर केला आहे. यामध्ये एटीएम ठिकाण दिले आहे. ज्यामध्ये प्रमुख शहरांमध्ये एटीएमची ही गाडी उपलब्ध होणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे. बँकेची ही सुविधा फक्त कोरोना संसर्गाचा अधिकचा प्रभाव असणाऱया ठिकाणीच उपलब्ध होणार आहे. यात कंटेंनमेंट झोनच्या ठिकाणी प्रतिबंध असणाऱया परिसरात ही सेवा दिली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
साधारणपणे देशभरात एकूण 14 हजारच्या जवळपास एटीएम आहेत. बँक ही मोबाईल एटीएम गाडी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने फिरवणार आहे. परंतु या गाडीच्या मदतीने सेवा देताना कोरोना प्रतिबंधात्मक सरकारने निश्चित केलेली नियमावली लागू करणे बंधनकारक राहणार असल्याचेही म्हटले आहे.
मागील वर्षातही अशीच सेवा
एचडीएफसी बँकेकडून मागच्या वर्षातही कोरोना संसर्गाच्या कालावधीत मार्च ते एप्रिल दरम्यान अशाच प्रकारची सेवा देण्यात आली होती. यामुळे सध्या पुन्हा कोरोना संसर्ग वाढत गेल्याच्या कारणास्तव ही सेवा बँकेने सुरू केली असल्याचे सांगितले आहे.