प्रतिनिधी / सातारा :
खिंडवाडी (ता. सातारा) येथील शिवाजी साहेबराव चव्हाण (वय 65) यांचे त्यांच्या राहत्या घरातून एटीएम कार्ड चोरुन खात्यातून तब्बल 2 लाख 10 हजार 348 रुपये काढून घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी चव्हाण यांचे खिंडवाडी येथील घरातून दि. 21 डिसेंबर 2021 च्या दुपारी 12.30 ते दि. 28 डिसेंबर 2021 च्या सकाळी 10 या कालावधीत अज्ञात चोरटय़ाने युनियन बँकेचे एटीएम कार्ड चोरुन नेले. त्या कार्डचा वापर करुन चोरट्याने त्यांच्या खात्यातून 2 लाख 10 हजार 348 रुपयांची रोखड काढून घेतली. या प्रकरणी अज्ञात चोरटय़ावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.