प्रतिनिधी / पर्वरी
आंर्बिना सुकूर येथील युनियन बँकेचे एटीएम मशिन चोरून आतील रोकड घेऊन पसार झालेल्या दोन संशयीत चोरटय़ांना पर्वरी पोलिसांनी गोव्यात आणून काल बुधवारी म्हापसा न्यायदंडाधिकाऱयांसमोर उभे केले असता 5 दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.
आंर्बिना सुकूर येथील युनियन बँकेच्या एटीएम मशिन पळवून त्यातील 19 लाख 3 हजार 400 रुपये घेऊन दिल्लीत पसार झालेल्या मुख्य संशयीत आरोपी रूस्तम सुहाग, त्याचे दोघे साथीदार सफिफुल मुल्ला व मोहम्मद सफी याना दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले होते. तीन पैकी सफिफूल मुल्ला व मोहम्मद सफी या दोन संशयित चोरटय़ांना पर्वरीतील बँकेच्या एटीएममधील चोरलेल्या रकमेसंदर्भात मंगळवारी रात्री 8.30 वा. सुमारास गोव्यात आणण्यात आले. दिल्लीत चोरटय़ाना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून रोख 3 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यामुळे उर्वरीत रकमेबद्दल चौकशी करण्यासाठी त्या दोघाना 5 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा रिमांड मंजूर करण्यात आला.
कोलवाळ येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरटय़ानी फोडून जुलै 2019 रोजी 10 लाख रुपयांची रोकड पळविली होती. त्यामुळे पोलिस त्या चोरटय़ाच्या पाळतीवर होते. युनियन बँकेचे एटीएम मशिन पळवून रोख पळविण्याच्या पद्धतीचे पोलिसांनी निरीक्षण करून या प्रकरणाचे धागेदोरे जोडून दोन्ही चोरीची प्रकरणे एकाच सराईत चोरटय़ाच्या गटाची असल्याचे संशयावरून इतर राज्यातील पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी 21 रोजी तिघांना अटक करण्यात यश मिळविले.
दिल्ली पोलिसांनी पर्वरी पोलिसांना या अटकेची माहिती दिल्यानंतर पोलिस वरिष्ठ अधिकाऱयाच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक निनाद देऊलकर यांनी 9 पोलिसांचे पथक दिल्लीत पाठविले. त्यामध्ये उपनिरीक्षक प्रतिक भट प्रभू, उपनिरीक्षक परेश सिनारी यांच्या नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल अजय कोरगावकर, दत्तराज चोडणकर, गणेश पार्सेकर, योगेश शिंदे, प्रज्योत परब, नितेश गावडे, चंदन मळीक, महादेव गावस व तुषार राऊत यांनी या मोहिमेत भाग घेतला.