चोरटय़ाचा फिल्मी स्टाईल पाठलाग
वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक एका चोरटय़ाने एटीएम फोडून पलायन केले, मात्र एटीएमच्या वॉचमनने प्रसंगवधान दाखवत त्याचा पाठलाग केला. तसेच पोलिसांना या बाबत माहिती दिली. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे सलग 5 तासाच्या थरारक पाठलागानंतर हा चोरटा पोलिसांच्या जाळय़ात सापडला.
हेमंत देसाई (रा. मुंबई) असे पकडण्यात आलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. पोलिसांनी वॉचमनच्या सहाय्याने फिल्मीस्टाईलने पाठलाग करत चोराला पकडले असून या चोरटय़ाकडून अनेक गुन्हय़ांची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळ श्री समर्थ कृपा बिल्डिंगच्या तळमजल्यावर पॅनरा बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी रात्री 11.15 च्या सुमारास तेथील वॉचमन संदीप नारायण महाडिक याने त्या चोरटय़ाला हटकले. यावेळी तो पळू लागल्याने वॉचमनने त्याचा पाठलाग सुरु केला. वॉचमनने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक उदय झावरे तातडीने सहकारे पोलीस शिंदे, देशमवांड, खोंदल, आव्हाड, रामपुरे तसेच होमगार्ड झेपले यांना घेवून घटनास्थळी आले. तोपर्यंत चोरटा संगमेश्वर बसस्थानकाच्या जवळच्या घरांमध्ये शिरला. पोलिसांनी त्या परिसराला घेरून चोरटय़ाचा शोध सुरु केला. ररात्रीच्या अंधारात सलग 5 तास केलेल्या पाठलागानंतर अखेर चोरटय़ाला पकडण्यात यश आले. या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात मधुकर देवरुखकर यांनी फिर्याद दिली.