Q
इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेतील विद्यमान विजेत्या एटीके-मोहन बगान फुटबॉल क्लबने आपल्या खेळाडूंच्या जर्सीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सदर क्लबच्या 131 वर्षांच्या इतिहासामध्ये फुटबॉलपटूंना देण्यात येणाऱया जर्सीच्या रंगामध्ये आजही कोणताही बदल न करण्याचा निर्णय या क्लबच्या संचालक मंडळाने शुक्रवारी घेतला. एटीके आणि मोहन बगान या क्लबच्या फुटबॉलपटूंना पूर्वीप्रमाणेच हिरव्या आणि तपकिरी रंगाची जर्सी नव्या हंगामासाठी पुरविली जाणार असून या जर्सीवर नौकानयनाचा लोगो राहील.
काही दिवसांपूर्वी एटीके एफसी क्लबचे मोहन बान क्लबमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे बगानचा क्लब यापुढे एटीके-मोहन बगान असा संबोधला जाईल, असे सांगण्यात आले. एटीकेचे बगानमध्ये विलीनीकरण करण्यात आल्याने एटीके क्लबच्या नौकानयन बोटीचा लोगो या जर्सीवर नव्याने ठेवण्यात आला आहे. बंगालमध्ये जागतिक दर्जाची फुटबॉल अकादमी स्थापन करण्याची घोषणा बगानच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. इंडियन सुपरलीग आणि एएफसी फुटबॉल स्पर्धेतील सामने या अकादमीत भरविण्याकरिता बगानकडून पूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे या क्लबचे प्रमुख मालक संजीव गोयंका यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर नजीकच्या काळात एटीके-बगान हा फुटबॉल संघ सर्वोत्तम बनविण्याचा आमचा प्रयत्न राहील. एटीकेचे सहमालक आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली हे या बैठकीला उपस्थित होते. सदर बैठक सुमारे 40 मिनिटे चालली होती. एटीके आणि बगान हे दोन संघ एकत्रित येत असल्याने आपण या निर्णयाचे स्वागत करतो आणि हे दोन्ही संघ भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये नवा इतिहास घडवतील, असा विश्वास सौरभ गांगुली यांनी व्यक्त केला. भारतीय फुटबॉल क्षेत्राचा दर्जा सुधारण्यासाठी नीता अंबानी यांचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या जानेवारीत एटीकेचे बगानमध्ये विलीनीकरण झाले होते. त्यानंतर 2020 च्या फुटबॉल हंगामात एटीकेने तिसऱयांदा इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धा जिंकताना गेल्या मार्चमध्ये अंतिम सामन्यात चेन्नयीन एफसीचा पराभव केला होता तर मोहन बगान संघाने आयलीग स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. 1996-97 साली देशात राष्ट्रीय लीग फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाल्यानंतर गोव्याचा धेंपो तसेच मोहन बगान या फुटबॉल संघांनी प्रत्येकी पाचवेळा विजेतेपद मिळविले आहे. शुक्रवारच्या बैठकीला एटीकेचे सहमालक उत्सव पारेख, गौतम रे, संजीव मेहरा हे उपस्थित होते.