माले (मालदीव) : मालेच्या नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर बुधवारी एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेत एटीके मोहन बागान आणि बेंगळूर एफसी यांच्यात ड गटातील (दक्षिण विभाग) सलामीची लढत होणार आहे. एटीके मोहन बागानचा संघ इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील उपविजेता आहे.
2020-21 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात एटीके मोहन बागान संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना उपविजेतेपद पटकाविले तर या स्पर्धेच्या गुणतक्त्यात बेंगळूर एफसीचा संघ सातव्या स्थानावर राहिला. गेल्या वर्षीच्या फुटबॉल हंगामात या दोन संघामध्ये दोनवेळा गाठ पडली आणि एटीके मोहन बागान संघाने दोन्ही सामन्यात बेंगळूर एफसीचा पराभव केला. एटीके बागान संघाने पहिल्या सामन्यात बेंगळूर एफसीचा 1-0 तर दुसऱया सामन्यात 2-0 असा पराभव केला. बुधवारच्या सामन्यात बेंगळूरच्या तुलनेत एटीके बागानचे पारडे निश्चितच जड वाटते.