वृत्तसंस्था/ मेलबर्न
एटीपी चषक सांघिक टेनिस स्पर्धेत इटली संघाने सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठली आहे. फ्रान्सविरुद्ध झालेल्या लढतीतील पहिले दोन सामने जिंकून त्यांनी शेवटच्या चारमधील स्थान निश्चित केले. या स्पर्धेत एकूण 12 संघांचा सहभाग आहे.
इटलीच्या फॅबिओ फॉगनिनीने फ्रान्सच्या बेनोई पेअरवर 6-1, 7-6 (7-2) अशी मात केल्यानंतर मॅटेव बेरेटिनीने फ्रान्सच्या गेल मोनफिल्सला 6-4, 6-2 असे हरविले. इटली या स्पर्धेत अद्याप अपराजित असून गट क मध्ये त्यांचे आघाडीचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. मंगळवारी पहिल्या लढतीत त्यांनी ऑस्ट्रियावर 2-1 अशा फरकाने मात केली होती. बुधवारी झालेल्या अन्य एका लढतीत जर्मनीने कॅनडाचा 2-0 असा पराभव केला. जर्मनीच्या जॅन लेनार्ड स्ट्रूफने मिलोस रेऑनिकचा 7-6 (7-4), 7-6 (7-2) असा तर अलेक्झांडर व्हेरेव्हने डेनिस शॅपोव्हॅलोव्हचा 6-7 (5-7), 6-3, 7-6 (7-4) असा पराभव केला. कॅनडाला पहिल्या लढतीतही विद्यमान विजेत्या सर्बियाकडून पराभव पत्करावा लागला होता. गट अ मध्ये अग्रस्थान मिळविण्यासाठी जर्मनीची पुढील लढत सर्बियाशीच गुरुवारी होणार आहे.