वृत्तसंस्था/ सिडनी
मेलबोर्नमध्ये पुढील आठवडय़ात खेळविल्या जाणाऱया एटीपी चषक पुरुषांच्या टेनिस स्पर्धेचा ड्रॉ शुक्रवारी येथे काढण्यात आला. या ड्रॉ नुसार सर्बियाचा टॉप सीडेड जोकोव्हिचच्या नेतृत्वाखाली सर्बिया संघाला सुरुवातीपासूनच अव्वल प्रतिस्पर्ध्यांशी मुकाबला करावा लागणार आहे. सदर स्पर्धा सांघिक स्वरुपात खेळविली जाणार आहे.
जोकोव्हिचच्या नेतृत्वाखाली सर्बिया संघाला आपल्या गटातील प्राथमिक फेरीत जर्मनी आणि कॅनडा यांच्याशी लढती द्याव्या लागतील. गेल्या वषी एटीपी टूरवरील ही सांघिक स्पर्धा पहिल्यांदा खेळविण्यात आली होती आणि सर्बियाने विजेतेपद पटकावले होते. 2021 साली सदर स्पर्धा मेलबोर्न पार्कच्या टेनिस कोर्टवर 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान खेळविली जाणार आहे. 8 फेब्रुवारीपासून मेलबोर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. एटीपी चषक सांघिक टेनिस स्पर्धेत जर्मनी संघाचे नेतृत्व ऍलेक्झांडर व्हेरेव्हकडे सोपविण्यात आले असून मिलोस रेओनिक कॅनडा संघाचा कर्णधार आहे. यावेळी अ गटात सर्बिया, जर्मनी आणि कॅनडा यांचा समावेश झाला आहे. ब गटातून नदालचा स्पेन संघ ग्रीस आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढती देतील. क गटात ऑस्ट्रिया तर ड गटात रशिया आघाडीवर राहील, असा अंदाज आहे. अर्जेंटिना आणि जपान यांचाही ड गटात समावेश आहे.