31 जुलैपर्यंत एकही टेनिस स्पर्धा होणार नाही, एटीपी टूर-आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेची घोषणा
हॅम्बर्ग / वृत्तसंस्था
एटीपी टूर आणि आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने व्यावसायिक टेनिस स्पर्धांवरील निलंबन दि. 31 जुलैपर्यंत कायम ठेवले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. यामुळे, हॅम्बर्ग, बस्तद, न्यूपोर्ट, लॉस काबोस, उमग, ऍटलांटा व कित्झबुहेलमधील स्पर्धा नियोजित रुपरेषेप्रमाणे सुरु होऊ शकणार नाहीत, हे निश्चित झाले. एटीपी चेअरमन आंद्रिया गॉडेन्झी यांनी पत्रकातून या निर्णयाची माहिती दिली.
एटीपी व डब्ल्यूटीएने यापूर्वी दि. 13 जुलैपर्यंत एकही स्पर्धा होणार नाही, असे जाहीर केले होते. हा निर्णय त्यांनी एप्रिलमध्ये घेतला होता. आता हे निलंबन जुलैअखेरपर्यंत कायम राहणार आहे. जुलैच्या उत्तरार्धात ज्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या, त्यांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्याचे डब्ल्यूटीएने येथे स्पष्ट केले.
‘टेनिस हंगाम शक्य तितक्या लवकर सुरु करणे हा आमचा प्राधान्यक्रम जरुर आहे. पण, त्याही पेक्षा सुरक्षिततेला आमचे अधिक महत्त्व असेल. ज्यावेळी स्पर्धा भरवण्यासाठी सुरक्षित वातावरण आहे, याची शाश्वती असेल, त्याचवेळी स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेतला जाईल’, असे आंद्रेया म्हणाले.
कार्लश्रुहे व पॅलेर्मो येथील स्पर्धा दि. 31 जुलैपर्यंत होणार नाहीत व सुधारित रुपरेषेबद्दल नंतर निर्णय घेतला जाईल, असे डब्ल्यूटीएने येथे जाहीर केले. आयटीएफ ज्युनियर्स, सिनियर्स, युनिक्लो व्हीलचेअर टेनिस टूर, बीच टेनिस टूर व पुरुष व महिला गटातील आयटीएफ वर्ल्ड टेनिस टूर या सर्व स्पर्धा पुढील सूचना येईतोवर निलंबित केल्या जात आहेत, असे त्यांनी नमूद केले.
अर्थात, आयटीएफच्या या निलंबनाला कोणत्याही प्रकारची ग्रँडस्लॅम स्पर्धा अपवाद असणार आहे. यंदाची विम्बल्डन स्पर्धा यापूर्वीच रद्द केली गेली असून अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा पूर्वनियोजित रुपरेषेनुसार दि. 24 ऑगस्टपासून सुरु होणे अपेक्षित आहे. सध्या लांबणीवर टाकली गेलेली प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धाही दि. 20 सप्टेंबरपासून सुरु होणे अपेक्षित आहे.