पोलीस मुख्यालयात अधिकाऱयांची बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक (एडीजीपी) प्रताप रेड्डी यांनी सोमवारी बेळगावला भेट दिली. आपल्या या बेळगाव दौऱयात त्यांनी वरिष्ट अधिकाऱयांची बैठक घेऊन निवडणूक बंदोबस्ताचा आढावा घेतला.
पोलीस मुख्यालयात झालेल्या बैठकीत बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पोलीस आयुक्त यशोदा वंटगोडी, मुत्तुराज, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्यासह बेळगाव शहर व जिह्यातील एसीपी व डीएसपी उपस्थित होते.
प्रताप रेड्डी यांचे सोमवारी पोलीस मुख्यालयात आगमन झाले. त्यावेळी पोलीस मुख्यालयाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. लोकसभा पोटनिवडणूक बंदोबस्तासंबंधी आतापर्यंत झालेल्या तयारीचा आढावा घेताना निर्भय वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिकाऱयांनी ठोस भूमिका घेण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. निवडणूक बंदोबस्तासाठी निमलष्करी दलाला पाचारण केले आहे. संवेदनशील भागात सुरक्षादलाचे पथसंचलनही सुरू आहे. बेळगाव शहराबरोबरच परिसरातील संवेदनशील भागात पथसंचलन झाले.