कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावाचा परिणाम – चालू आर्थिक वर्षाचा राहणार समावेश
नवी दिल्ली
भारतामधील कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेमध्ये झालेल्या नुकसानीचे कारण पुढे करून आशियाई विकास बँकेने (एडीबी) चालू आर्थिक वर्षासाठी देशातील आर्थिक वृद्धीचा अंदाज घटवून 10 टक्के केला आहे. या अगोदर हा अंदाज 11 टक्के इतका वर्तवला होता.
एडीबीने बुधवारी आपला ताज्या आर्थिक अहवालामध्ये आर्थिक वर्ष 2021 (मार्च रोजी समाप्त)भारतासाठी वृद्धी अंदाज सादर केला आहे. चालू वर्षातील मे महिन्यात कोविड संसर्गाच्या दुसऱया लाटेच्या कारणास्तव अर्थव्यवस्था प्रभावीत राहिली असून यामध्ये विविध घटकांच्या उत्पादनांचा समावेश राहिला असल्याची माहिती आहे.
ज्या राज्यांमध्ये लॉकडाऊन व कोरोनाची लाट ओसरत आहे, त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी निर्माण होणार असल्याचे भाकित एडीबीने नोंदवले आहे. अहवालामध्ये म्हटले आहे, की मुख्य तीन तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये तेजी राहणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये संपूर्ण आर्थिक वर्षात 10 टक्क्यांच्या दराने ही वाढ राहण्याची शक्यता असून दुसरीकडे आर्थिक वर्ष 2022 साठी हा दर 7.5 टक्के राहणार असल्याची शक्यता एडीबीने यावेळी व्यक्त केली आहे.