वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी ‘एथिक्स आयोग’ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान एथिक्स आयोग बरखास्त करण्याचा बात्रा यांचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे प्रतिपादन आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी केले आहे.
भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये बात्रा आणि मेहता या व्यक्ती आघाडीच्या म्हणून ओळखल्या जातात. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता यांच्याकडे सोपविण्यात आलेली बरीच जबाबदारी आपण घेत असल्याचे स्पष्टीकरण अध्यक्ष बात्रा यांनी यापूर्वी दिले होते. आता मेहता आणि बात्रा यांच्यात शाब्दीक संघर्ष सुरू झाला आहे. 2017 साली भारतीय ऑलिंपिक संघटनेने निवृत्त न्यायाधीश व्ही.के.गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एथिक्स आयोगाची नियुक्ती केली होती. आता अध्यक्ष बात्रा यांनी हा आयोग बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय ऑलिंपिक संघटनेमध्ये नव्याने संघर्ष सुरू झाला आहे. बात्रा यांनी एथिक्स आयोग बरखास्त करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे मेहता यांनी संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना तसेच राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन व राज्य ऑलिंपिक संघटनांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे. बरखास्त करण्यात आलेले एथिक्स आयोग पुन्हा स्थापन करू, असेही मेहता यांनी म्हटले आहे.