दहशतवादी संघटनांशी लागेबांधेच्या संशयावरुन जुना बुधवार पेठेत कारवाई : आठ दिवसात दुसऱयांदा छापे
कोल्हापूर प्रतिनिधी
दहशतवादी संघटनांशी लागेबांधे असल्याच्या संशयावरुन मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एनआय व एटीएस पथकाने कोल्हापुरात छापे टाकले. जुना बुधवार पेठेतील गवंडी मोहल्यात कारवाई करुन 30 वर्षीय तरुणास ताब्यात घेतले आहे. त्याला नाशिक येथील एटीएस कार्यालयात नेण्यात आले आहे. गेल्या 8 दिवसांत दुसऱयांदा कोल्हापुरात कारवाई करण्यात आल्याने स्थानिक पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आले आहे.
दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंधीत तसेच त्यांच्यासाठी फंडीगचे काम करणाऱ्या काही संघटना एनआयए आणि मुंबई दहशतवाद विरोधी पथकाच्या रडारावर आहेत. याच अनुषंगाने पीएफआय या संघटनेच्या विविध ठिकाणांवर 22 सप्टेंबरपासून छापेमारी सुरु आहे. 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एनआय व एटीएस पथकाने कोल्हापुरात कारवाई केली. यावेळी मौला नबीसाब मुल्ला (वय 35 रा. सिरत मोहल्ला, सुभाषनगर) याला अटक केली. मौलाच्या घराची झडती घेत महत्वपुर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली होती. अद्यापही मौला नाशिक येथे एटीएस पोलीस कोठडीमध्ये आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटे पुन्हा एनआयए व एटीएस पथकाने कोल्हापुरात कारवाई केली. यावेळी जुना बुधवार पेठ येथील एका 30 वर्षीय तरुणास ताब्यात घेतले. अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आली. सदरचा तरुण पीएफआय या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 1 तासाहून अधिक वेळ तपास पथकातील अधिकाऱयांनी संबंधीत तरुणाच्या घराची झडती घेतली. यावेळी तो रंकाळा परिसरात भाडय़ाने राहत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी त्या घराचीही झडती घेतल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. 4. 30 वाजण्याच्या सुमारास हे पथक संशयीताला घेवून मुंबईकडे रवाना झाले. त्याला चौकशीसाठी मुंबई येथील दहशतवाद विरोधी कार्यालयात नेण्यात आले. 22 सप्टेंबर रोजी पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष मौला नबीसाब मुल्ला (वय 38 रा. सिरत मोहल्ला, सुभाषनगर) याला अटक केले होते. तर अवघ्या आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा कोल्हापूरात कारवाई केली आहे.
तपास एनआयएचा पथक एटीएसचे
देशात दहशवादी कारवाया तसेच अन्य देशविरोधी कृत्यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा सहभाग उघड झाला आहे. एनआयएच्या रडारावर गेल्या दीड वर्षापासून ही संघटना होती. वर्षभराच्या तपासानंतर या संघटनेवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएस पथकाची दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. नाशिक व मुंबई अशी विभागणी करण्यात आली आहे. नाशिक येथील टिम कोल्हापूरमध्ये कारवाई करत आहे.
फळ विक्रेता ते पीएफआय पदाधिकारी
संशयित तरुण हा फळ विक्रीचे काम करत होता. मौला मुल्ला याच्या संपर्कात तो कायम होता. मौला मुल्ला सध्या पीएफआयचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होता. मात्र त्याचे संघटन कौशल्य पाहून संघटनेने त्याला राज्य कार्यकारिणीवर घेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. मुल्ला मौलाच्या जागेवर मंगळवारी कारवाई केलेल्या संशयीताची वर्णी लागणार होती. मात्र तत्पूर्वीच त्याच्यावर कारवाई करण्यात आली.