पुणे / प्रतिनिधी :
सरकारला जागे करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात येत्या 24 तारखेला वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद राहणार असल्याची माहिती वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बंदमध्ये 35 संघटना सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
देशात लोकशाहीचा अंश दिसत नसून हिटलरशाही दिसते. देशाची आजची परस्थिती अराजकता माजेल अशी झाली आहे. या परिस्थितीला भाजप आणि आरएसएस हे जबाबदार आहेत. कारण देशात लोकशाहीचा अंश दिसत नसून हिटलरशाही दिसत आहे. धमकावणे, दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. भीती आणि दहशतवाद निर्माण झाला, ही दहशत वाढवी म्हणून तीन कायदे लागू करण्याचे काम सरकारने केले आहे, ते असंवैधानिक आणि आरएसएस प्रणित आहेत. याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
हे सरकार दारुडय़ांसारखे
हे सरकार दारुडय़ांसारखे आहे. दारुडय़ा व्यक्तीला दारू नाही मिळाली तर, घरातील वस्तू विकतो तसे हे सरकार सोन्याचे अंडे देणारी भारत पेट्रोलियम कंपनी विकायला निघाले आहेत, यामुळे भविष्यात प्रचंड बेरोजगारी वाढणार आहे, अशा शब्दात आंबेडकर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.