कच्छ येथे होणार प्रकल्प – 4,750 मेगावॅट क्षमता
मुंबई
देशातील सर्वात मोठा रिन्यूएबल एनर्जीचा सोलार पार्क बनविण्याची योजना एनटीपीसी कंपनी आखत आहे. सदरचा प्रकल्प हा देशात गुजरातमधील कच्छ येथे स्थापला जाणार असल्याची माहिती आहे. जवळपास 4,750 मेगावॅट ऊर्जा क्षमतेचा पार्क तयार करणार असल्याचे संकेत आहेत.
याकरीता कंपनीला नवीकरण ऊर्जा मंत्रालयाकडून रीतसर मंजुरी मिळालेली आहे. सदरच्या पार्कमध्ये व्यावसायिक स्तरावर हरित हायड्रोजनचे उत्पादन घेणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. कंपनी गुजरात राज्यातील कच्छ जिल्हय़ातील खवडा आणि विघकोट गावाच्या जवळ ओसाड जमिनीवर हा प्रकल्प उभारणार आहे.
60 गीगावॅट हरित वीज उत्पादनाचे ध्येय
कंपनीची रिन्यूएबल एनर्जीची क्षमता जवळपास 1,400 मेगावॅट आहे. तर 2032 पर्यंत 60 गीगावॅट हरित वीज उत्पादन करण्याचे ध्येय एनटीपीसी कंपनीने निश्चित केले आहे. वर्तमान काळात 70 वीज प्रकल्प योजनांमधून 66 गीगावॅट क्षमतेच्या ऊर्जेचे उत्पादन घेणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.