प्रतिनिधी / वाकरे
पाडळी खुर्द व बालिंगे (ता.करवीर) येथे भोगावती नदीच्या महापुरात बचावकार्यात मग्न असणाऱ्या एनडीआरएफच्या जखमी जवानावर बालिंगे येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी मोफत उपचार करून माणुसकी अजूनही जिवंत असल्याची प्रचिती आणून दिली. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या माणुसकीचे दर्शन घडले.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की पाडळी खुर्द व बालिंगा येथे भोगावती नदीच्या महापुरात अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य एनडीआरएफ पुणेचे जवान करीत होते.सोमवारी दुपारी करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथे महापूराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पुण्यातील ‘एनडीआरएफ’ची रेस्क्यू बोट जवानासह गावात पोहचली. पूरात अडकलेल्या कुटूंबांना घेऊन रेस्क्यू बोट काठावर पोहचली.बोटीतील जवान दयानंद गणपती गुरव हे तोल जाऊन पाण्यातील खडकावर आपटले. त्यांच्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली. वेदनेने विव्हळणाऱ्या जवान गुरव यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने बालिंगा येथील सह्याद्री या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने डॉ. अमर देसाई, डॉ. दीपक शिंदे, चंद्रकांत नलवडे,प्रदीप पोवार यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी केली. हे जवान सेवा करण्यासाठी कोल्हापूरात आले होते, त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या शस्त्रक्रियेचे पैसे स्विकारण्यास संबधीत डॉक्टरांनी नकार दिला. तसेच माणुसकीच्या भावनेने जखमी जवानाला मोफत औषधे देऊन पाठवण्यात आले. ऐन महापुरात कोल्हापूरच्या डॉक्टरांनी माणुसकीचे दर्शन घडवल्याने जवान आणि सर्व टीमने कोल्हापूरकरांच्या माणुसकीचे आभार मानले.तुम्ही आमच्यासाठी देवदूत आहात. स्वतःचे प्राण धोक्यात घालून आमची सेवा करत आहात. तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या असे म्हणत या डॉक्टर्सनी एनडीआरएफच्या जवानावर मोफत शस्त्रक्रिया केली.
कोल्हापूरकर लय भारी
कोल्हापुरकर म्हणजे दिलदार माणसं. कोल्हापूरकरांच्या दिलदार व्यक्तिमत्वाची चर्चा जगभरात होते. जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव कोल्हापूरकरांच्या कर्तुत्वाने जाहीर झाले आहे. त्याचाच प्रत्यय एनडीआरएफच्या जवानांना आला. त्यामुळे गुरव यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर जवानांच्या तोंडातून कोल्हापूरकर लय भारी असे शब्द अलगद बाहेर पडले.