पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये एअर फोर्स फ्लाईंग ऑफीसरपदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचे सांगून वेगवेगळय़ा कारणासाठी एक लाख 32 हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने नियुक्तीची बनावट कागदपत्रे पाठविल्याचे आढळून आले आहे.
याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नवीन त्रिपाठी (वय 32, रा. उत्तर प्रदेश) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदार यांना ते स्वतः एनडीएमध्ये लष्करी अधिकारी असल्याचे भासविले. त्यांनादेखील एनडीएमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर एनडीएमध्ये तुमची एअर फोर्स फ्लाईंग ऑफीसरपदासाठी निवड केल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांना एनडीएकडून शुभेच्छापत्र, एनडीएचे माहितीपत्रक, अर्ज अशा विविध गोष्टी पाठविल्या. त्यांना मेडीकलसाठी बोलवूनदेखील घेतले. त्यानंतर विविध कारणासाठी त्यांच्याकडून एक लाख 32 हजार रूपये बँकेत भरायला लावले.