वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2019 साली दर्जा न राखता आल्याने राष्ट्रीय डोप टेस्टिंग लॅबोरेटरीची (एनडीटीएल) मान्यता विश्व डोपिंग विरोधी एजन्सीने, (वाडा) रद्द केली होती. आता वाडाने एनडीटीएलला अधिकृत मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी दिली आहे.
एनडीटीएलचे कार्यालय दिल्लीमध्ये आहे. या प्रयोगशाळेला वाडाची आता अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तेजकांना निर्बंध घालण्यासाठी संपूर्ण जगामध्ये प्रयत्न चालू आहेत. उत्तेजक चाचणी महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पूर्वसूचना न देता घेतली जाते. या चाचणीमध्ये आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 2019 च्या ऑगस्टमध्ये वाडाने एनडीटीएलवर पहिल्यांदा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी बंदी घातली होती. त्यानंतर या बंदीचा कालावधी निरीक्षणानंतर वाढविण्यात आला होता. दिल्लीमध्ये असलेल्या एनडीटीएलमध्ये आता सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळेमध्ये आता उत्तेजक चाचणीसाठी विविध खेळाडूंच्या मुत्रल नमुन्यांची छाननी केली जाणार आहे, असेही केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सांगितले.