हेलिकॉप्टर अपघातात 13 वर्षीय मुलीसह 9 जणांचा मृत्यू, क्रीडा क्षेत्रावर शोककळा
वृत्तसंस्था/ लॉस एंजेलिस
एनबीएचा महान बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचे मुलीसह रविवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या अपघातात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळले आणि लगेच पेट घेतल्याने सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या धक्कादायक वृत्ताने जागतिक क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
41 वर्षीय ब्रायंट 13 वर्षीय मुलगी गियेना व अन्य सात प्रवासी व क्रू मेंबर्ससह सिकोरस्काय एस-76 या हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत होता. लॉस एंजेलिसच्या पश्चिमेस असलेल्या कॅलाबासासच्या डोंगराळ भागात ते कोसळले आणि पेट घेतले. ब्रायंट पाचवेळचा एनबीए चॅम्पियन असून त्याने दोनदा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविले आहे. बास्केटबॉलच्या इतिहासातील तो सर्वात महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. गेल्या दोन दशकात बास्केटबॉल म्हणजे कोबी ब्रायंट अशी ओळख निर्माण केली होती. लॉस एंजेलिस लेकर्सचे तो प्रतिनिधित्व करीत होता.
हेलिकॉप्टर कोसळले तेथे जाऊन शोध घेण्याचा अग्निशामक दलानी पुरेपूर प्रयत्न केले. पण त्यांना त्यातील एकही प्रवासी जिवंत आढळला नाही. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी राष्ट्रीय दळणवळण सुरक्षा मंडळाने 18 सदस्यीय तपास पथक कॅलिफोर्नियाला पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. ब्रायंटच्या मृत्यूच्या वृत्ताने जगभरातील क्रीडापटूंना धक्का बसला असून बास्केटबॉल स्टार्स तर सुन्न झाले आहेत. अनेकांनी ट्विटच्या माध्यमांतून त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पॉप स्टार्स, विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू यांचा समावेश आहे. ‘ब्लॅक माम्बा’ने बास्केटबॉलला नव्या उंचीवर नेवून ठेवले असल्याचेच प्रत्येकाचे मत आहे.
हायस्कूल शिक्षण संपल्यानंतर 1996 मध्ये त्याची एनबीए कारकीर्द सुरू झाली आणि 2016 मध्ये तो निवृत्त झाला. त्याने पाचवेळा एनबीए चॅम्पियनशिप जिंकली असून 2008 बीजिंग आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेला बॉस्केटबॉलचे सुवर्ण मिळवून दिले होते. 2016 मध्ये तो एनबीएमधून निवृत्त झाला आणि शेवटच्या सामन्यात त्याने 60 गुण नोंदवले होते. माजी एनबीए खेळाडू जो जेलीबीन ब्रायंट यांचा तो मुलगा असून 1978 मध्ये फिलाडेल्फियात त्याचा जन्म झाला होता. त्याचे वडील 1984 ते 1991 या कालावधीत इटलीमध्ये खेळले होते. 17 व्या वर्षी कोबी व्यावसायिक खेळाडू बनला. एवढय़ा लहान वयात मोठी झेप घेणारा तो सहावा खेळाडू होता. 2018 मध्ये बास्केटबॉलच्या प्रेमाखातर लिहिलेल्या पत्रावरून निर्माण करण्यात आलेल्या ‘डीयर बास्केटबॉल’ या ऍनिमेटेड शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.