बीसीसीआयने अर्ज करण्याची मुदत वाढवली, द्रविडची बहुमताने निवड होणे जवळपास निश्चित
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) अध्यक्षपदासाठी नव्याने अर्ज केला असून त्याची निवड जवळपास निश्चित असेल, अशी स्थिती असल्याने या जागेसाठी अन्य एकही अर्ज आलेला नाही. द्रविडची 2 वर्षांची मुदत पूर्ण झाली असून एनसीए अध्यक्षपदाला मुदतवाढीची तरतूद नसल्याने बीसीसीआयने नव्याने निवड प्रक्रिया सुरु केली.
‘राहुलने अध्यक्षपदासाठी नव्याने अर्ज दाखल केला आहे आणि त्याने मागील 2 वर्षात एनसीएचा चेहरामोहरा बदलला असल्याने त्याची पुन्हा निवड झाल्यास यात आश्चर्याचे कारण नाही’, असे बीसीसीआयमधील सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
तूर्तास, बीसीसीआयने आणखी कोणाला अर्ज करायचा असेल तर अधिक संधी द्यावी, यासाठी मुदत वाढवली आहे. यापूर्वी, दि. 15 ऑगस्टपर्यंत मुदत होती. ती काही दिवसांनी वाढवली गेली आहे. मात्र, यानंतरही द्रविडची निवड जवळपास निश्चित असल्याने त्याच्या उंचीचा आणखी कोणत्याही व्यक्तीचा अर्ज येण्याची शक्यता जवळपास दुरापास्त आहे.
‘द्रविड रिंगणात असल्याने आणि त्याची निवड जवळपास निश्चित असल्याने अर्ज करण्यात फारसा अर्थ नाही, हे प्रत्येक जण जाणून आहे. आमच्या मते केवळ औपचारिकता बाकी आहे’, असे सूत्राने याबद्दल अधिक बोलताना नमूद केले. यापूर्वी राहुल द्रविड धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमवेत प्रशिक्षक या नात्याने लंका दौऱयावर गेला होता. मात्र, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होण्याची त्याची त्यावेळी फारशी इच्छा दिसून आली नव्हती. विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मुदत नोव्हेंबरपर्यंत आहे. द्रविड पुढील प्रशिक्षक असू शकतो, अशी चर्चा यापूर्वी सुरु झाली आहे.
नागरकोटी, चक्रवर्ती एनसीएत दाखल
दुखापतग्रस्त वरुण चक्रवर्ती व कमलेश नागरकोटी हे शुभमन गिलसह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाले. पुढील महिन्यात आयपीएलच्या उर्वरित टप्प्यासाठी वेळीच तंदुरुस्त व्हावे, यासाठी केकेआरचे हे त्रिकूट सध्या तयारी करत आहे.