आसगाव, मिरामार, हरमल येथे एनसीबीचे छापे : कोंगो, नायजेरियनालाही अटक ,रोख रक्कमेसह मोठय़ाप्रमाणात ड्रग्स जप्त .हेमंत साहाचे सुशांतसिंह मृत्यू कनेक्शन
प्रतिनिधी / पणजी
बॉलिवूड क्षेत्रातील ड्रग्स प्रकरणासंदर्भात नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी) अधिकाऱयांनी काल सोमवारी गोव्यात तीन ठिकाणी छापे मारून लाखोंच्या रक्कमेसह मोठय़ाप्रमाणात ड्रग्स जप्त केला आहे. दोन विदेशी तर एका देशी संशयिताला अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता मयत सुशांतसिंह राजपूत याला ड्रग्स पुरविल्या प्रकरणात हेमंत साहा उर्फ महाराज या ड्रग्स पेडलरलाही एनसीबीने अटक केली आहे. त्यामुळे एनसीबीचे गोव्यातील हे छापे हे सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधीत असल्याचे दिसून येत आहे.
हेमंत साहा हा सुशांतसिंह राजपूत प्रकरणात संशयित आहे. त्याला गोव्यात अटक झाल्याची वार्ता सकाळी पसरताच सर्वत्र खळबळ माजली.
मध्यरात्री मिरामार येथून हेमंत साहाला अटक
एनसीबीची आसगाव व हरमल येथे कारवाई सुरु असतानाच मयत सुशांतसिंहला ड्रग्स पुरविणारा संशियत हेमंत साहा उर्फ महाराज हा मिरामार येथे असल्याची माहिती एसीबीला मिळाली होती. त्यांनी ती एनसीबीला दिल्यानंतर एनसीबीने आसगाव, हरमल येथील कारवाई थांबवून त्वरित आपला मोर्चा मिरामार येथे वळविला. रविवारी मध्यरात्रीनंतर मिरामार येथे हेमंत साहालाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एलएसडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. मुंबई व गोवा नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे प्रमुख समीर वानखडे यांनी ही माहिती दिली आहे.
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी हवा होता हेमंत साहा
हेमंत हा मूळ मध्यप्रदेश येथील असल्याचे त्यांनी सांगितले. सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अटक केलेल्या अनुज केशवानी व रेगल महाखाला यांनी हेमंत साहाचे नाव उघड केले होते. हेमंत साहा हा गोव्यात मोरजी येथे शॅक चालवत होता. मुंबई पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी यापुर्वी एकदा मोरजी येथे छापा मारला होता, मात्र तो पोलासंच्या हाती लागला नव्हता. नंतर काही दिवसांनी हेमंत साहाने अपले बस्थान मिरामार येथे हलविले होते. अखेर एनसीबीने त्याला रविवारी मध्यरात्रीनंतर मिरामार येथे अटक केली आहे.
रविवार सायंकाळपासून सोमवारी पहाटेपर्यंत कारवाया
रविवारी रात्री एका कारवाईत हणजूण, आसगाव येथे उगोच्युकू सॉलोमोन या नायजेरियन नागरिकाला तसेच जॉन डेव्हिड या कोंगो नागरिकाला अटक करून त्यांच्याकडून एलएसडी, चरस, गांजा, कोकेन आदी ड्रग्स मोठय़ा प्रमाणात जप्त केल्याचीही माहिती वानखडे यांनी दिली आहे. या कारवाया रविवारी 7 रोजी संध्याकाळपासून सुरु झाल्या आणि सोमवारी पहाटेपर्यंत सुरु होत्या. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱयांचे गोव्यात ठिकठिकाणी धाडसत्र सुरुच आहे. उगोच्युकू सॉलोमोन याला या अगोदर म्हणजे 2013 सालात गोवा पोलिसांनी अटक केली होती.
प्रसाद वाळके निसटला
दरम्यान उगोच्युकू सॉलोमोन (नायजेरियन) जॉन डेव्हिड यांची उलट तपासणी करताना संशयित प्रसाद वाळके याचाही या प्रकरणात हात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. एनसीबीने वाळके याच्या निवास्थानावर छापा मारून एलएसडी पेपर ड्रग्स जप्त केले असून एनसीबी अधिकारी त्याचा शोध घेत आहेत. प्रसाद वाळके हा सराईत गुन्हेगार असून 2018 साली त्याला एनसीबीने ड्रग्स पुरविण्याच्या प्रकरणात अटक केली होती. एनसीबीने रोख रक्कम 10 हजार रुपये (भारतीय चलन) तसेच मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारचे ड्रग्स जप्त केले असून त्यांची किमंत लाखांच्या घरात जाणार आहे. त्यात 55 एलएसडी पेपर, 58 ग्राम चरस, 22 ग्राम कोकीन, 1 किलो 100 ग्राम चरस, 660 ग्राम विदेशी ड्रग्सचा समावेश आहे.