प्रतिनिधी / कारवार
येथील 29 कर्नाटक बटालियन एनसीसीतर्फे ‘स्वच्छता पंधरवडा’ कार्यक्रमाचे आयोजन हाती घेण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत येथील सरकारी तंत्रनिकेतन आणि सेंट मायकल कॉन्व्हेंट माध्यमिक शाळेतर्फे येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱयावरील कचरा गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत 37 एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते.
कचरा गोळा करण्यापूर्वी उपस्थित कॅडेट्सना आपला परिसर आपणच कसा स्वच्छ ठेवला पाहिजे, याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर होणाऱया दुष्परिणामाबद्दल माहिती देण्यात आली आणि पर्यावरण रक्षणाच्या बाबतीत एनसीसी कॅडेट्स महत्त्वपूर्ण भूमिका कशी बजावू शकतात याबद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली.
स्वच्छता मोहिमेत हवालदार अनिल खराडे, हवालदार हरीश सिंग, सरकारी तंत्रनिकेतनचे लेफ्टनंट सुशांत अंकोलेकर, सेंट मायकल कॉन्व्हेंट माध्यमिक शाळेच्या शबाना शेख सहभागी झाल्या होत्या.