प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या जाधवनगर येथील एनसीसी परेड ग्राऊंडवर एनसीसी बेळगाव ग्रुपच्या अधिपत्याखाली प्रजासत्ताक दिन तयारी शिबिर व वार्षिक प्रशिक्षण शिबिराची सुरुवात झाली. हे शिबिर 13 ते 22 ऑक्टोबर यादरम्यान चालू राहणार आहे.
26 जानेवारीला दिल्ली येथे होणाऱया राजपथावरील संचलनासाठी एनसीसी छात्रांच्या निवडीसाठी व सैन्य दलातील करिअर संधींबाबत एनसीसी छात्रांना मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्नल के. श्रीनिवास ग्रुप कमांडर एनसीसी यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी छात्रांना सर्व धर्म समभाव, देशसेवा तसेच एकता व अखंडता हीच आपल्या देशाची प्रमुख ताकद असल्याचे सांगितले. या शिबिरात एनसीसीच्या तिन्ही विभागांतर्फे 400 छात्रांचा समावेश आहे. हे छात्र कर्नाटक व गोवा राज्यांतील निवडक छात्र आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक सैन्य अधिकारी या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कॅम्प कमांडंट कर्नल राजीव पट्टनी, कर्नल खजुरिया, कर्नल ए. के. शर्मा, ग्रुप कॅप्टन यु. डी. पाटकर, लेफ्टनंट कर्नल नंदकुमार व समीर पवार उपस्थित होते.