प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. त्यामुळे भाजीमार्केटमध्ये होत असलेल्या गर्दीचा विचार करुन ते इतरत्र सुरू करण्यात आले. आता तब्बल 77 दिवसांनंतर एपीएमसीमधील भाजीमार्केट सुरू करण्यात आले आहे. याआधी उपनगरांमधील तीन ठिकाणी भाजीमार्केट सुरू होते. मात्र त्या ठिकाणी योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याने आणि व्यापाऱयांबरोबरच ग्राहकांची हेळसांड होत असल्याने अनेकांचा विरोध वाढत होता. शहराबाहेर असलेले भाजीमार्केट पुन्हा एपीएमसीमध्ये सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांबरोबर वारंवार चर्चा करण्यात आली. अखेर जिल्हाधिकाऱयांनी एपीएमसीमध्ये भाजीमार्केट सुरू करण्यास हिरवा कंदिल दाखविला आणि मंगळवारी हे मार्केट सुरू करण्यात आले.
भाजीमार्केटमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी मार्किंग करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये हिंडाल्को, ऑटोनगर, आणि बी. एस. येडियुराप्पा मार्ग येथील अलारवाड रोडजवळ भाजीमार्केट सुरू करण्यात आले होते. मात्र अवकाळी पावसामध्ये या ठिकाणी भाजी खरेदी-विक्री करणे गैरसोयीचे बनले होते. अशातच जोरदार वाऱयासह पडलेल्या पावसात या गाळय़ांचे पत्रेही उडाले होते. यामध्ये एका हमालाच्या हाताला इजा पोहोचली. त्यामुळे येथील समस्या सोडविण्यासाठी व्यापाऱयांनी बेमुदत व्यवहार बंद करुन आंदोलन छेडण्याचे जाहीर केले होते.
एपीएमसीमधील भाजीमार्केट सुरू करण्यात आल्याने व्यापारी व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असलेले हे भाजीमार्केट बंद असल्याने मोठी गैरसोय झाली होती. अनेक ठिकाणी भाजी खरेदी विक्री करणे अवघड बनले होते. त्यामुळे शेतकऱयांबरोबरच व्यापाऱयांनाही त्रास सहन करावा लागत होता.
एपीएमसीमधील भाजीमार्केट येथे रोज लाखेंची उलाढाल होत असते. येथील भाजी गोवा, महाराष्ट्र यासह देशभरात पोहोचविण्यात येते. मात्र वाहतूक ठप्प आणि भाजीमार्केट इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करुन मंगळवारपासून एपीएमसीमध्ये भाजीमार्केट सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
एपीएमसी अध्यक्ष आनंद पाटील
मागील 15 दिवसांपासून आम्ही एपीएमसीमध्ये भाजीमार्केट सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या भेटी घेतल्या. मात्र नियमांचे उल्लंघन होईल आणि कोरोनासारखा आजार बळावेल यासाठी परवानगी नाकारण्यात येत होती. मात्र सुरक्षित अंतर ठेवूनच आम्ही सर्व व्यवहार करू, असे आश्वासन दिल्यानंतर मंगळवारपासून एपीएमसीत भाजीमार्केट सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.