वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिन्याभरापासून बेळगाव परिसरातील स्थानिक गुळाची आवक सुरू झाली आहे. त्याचा भाव आवक प्रारंभी 3700 ते 3800 होता. मात्र पंधरवडय़ापासून आवक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम शनिवारी बाजारात चांगल्या प्रतिच्या गुळाचा भाव 3400 रु. असा झाला. गूळ आवक असलेल्या शेतकरी बांधवाला फेटा बांधून पेढे वाटून स्वागत करण्यात येत आहे.
शनिवारी कांदा दरात 1000 रु. तर राज्यातील बटाटा दरात 300 रु. स्थानिक चांगल्या प्रतिचा गोळा बटाटा 400 रु., रताळी 100 रु. कमी झाली. मात्र बियाणासाठी वापरात येणारा मध्यम प्रकारचा बटाटा 200 रु. महागला.
शनिवारी बाजारात कांदा 55 ट्रक, परराज्यातील बटाटा 23 ट्रक, जवारी बटाटा 1000 पिशव्या, रताळी 13000 पोती तर गूळ 4000 रवे इतकी आवक झाली.
बाजारातील 55 ट्रक कांद्यापैकी प्रदेशातून 12 ट्रक, कर्नाटकातून 12 ट्रक तर उर्वरित सर्व कांदा आवक महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची होती. बाजारात कांदा आवक मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामानाने जावक थंडावली आहे. याचा परिणाम कांदा दरात घसरण होत असल्याची माहिती लेखापाल सुनील संभाजी यांनी दिली. बाजारात मोठय़ा प्रमाणात नवीन कांदा आवक तर तुरळक प्रमाणात जुन्या कांद्याची आवक होत आहे.
बाजारातील कांद्याचे भाव
गोळी 2000 ते 2500
मध्यम 2600 ते 3000
गोळा 3500 ते 4000
सफेद 5000 ते 6000
इजिप्त 1000 ते 3000
बाजारात स्थानिक जवारी बटाटा आवक जवळजवळ संपुष्टात येत आहे. याचा परिणाम परराज्यातील बटाटा आवक वाढली आहे. परराज्यातील बटाटा दरात 300 रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती व्यापारी तुषार टुमरी यांनी दिली. इंदोरमधून नवीन बटाटा आवकेला शनिवारपासून सुरुवात जाली आहे. आवक प्रारंभी त्याचा भाव 3000 ते 3200 रु. असा झाला. शनिवारी बाजारात परराज्यातील 23 ट्रक इतकी बटाटा आवक झाली होती. यामध्ये इंदोर 10 ट्रक, कोलार 4 ट्रक, तळेगाव 4 ट्रक, आग्रा 3 ट्रक, गुजरात 2 ट्रक बटाटा आवक होती.
बाजारात बेळगाव तालुका परिसरातील बटाटा उत्पादक क्षेत्रामधून तुरळक प्रमाणात बटाटा आवक होत आहे. याचा परिणाम खावयाचा चांगल्या प्रतिच्या गोळा बटाटा दरात 400 रुपयांची घसरण झाली. तर मध्यम प्रकारच्या बियाणांसाठी वापरात येणारा बटाटा 200 रु. महागला. महिन्याभरात काही बाजाराचा अपवाद वगळता खायच्या चांगल्या प्रतिच्या बटाटय़ावर दराच्या बाबतीत यावर्षी बियाणांसाठी वापरात येणारा बटाटा कायमच तेजीत राहून भाव खाऊ न जात असल्याची माहिती व्यापारी प्रकाश पाटील यांनी दिली.
दिल्ली परिसरात शेतकरी बांधवांच्या आंदोलनामुळे बेळगाव रताळी पिकाला मागणी कमी झाली आहे. याचा परिणाम रताळी दरात 100 रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती व्यापारी राजू पाटील यांनी दिली.
बेळगाव बटाटय़ाचे भाव
गोळी 1000 ते 1500
गुल्टा 2100 ते 2500
मध्यम 3000 ते 4200
गोळा 3000 ते 3200
रताळय़ाचे भाव
चांगल्या प्रतिची रताळी 900 ते 1100
सर्वसाधारण 800 ते 1000