बेळगाव : एपीएमसी रोडवरील फुटपाथवर धोकादायक ट्रान्स्फॉर्मर आहे. हा ट्रान्स्फॉर्मर फुटपाथवरून ये-जा करणाऱया नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. रात्रीच्या वेळी ट्रान्स्फॉर्मरसाठी लावण्यात आलेले विद्युत खांब निदर्शनास न आल्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा ट्रान्स्फॉर्मर इतरत्र हलविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात अनेक ठिकाणी धोकादायक ट्रान्स्फॉर्मर व विद्युत वाहिन्या असूनदेखील त्याकडे हेस्कॉम जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे अनेक वेळा लहान-मोठे अपघात घडत आहेत. परंतु हेस्कॉमकडून त्याच्या दुरुस्तीकडे पाठ फिरविली जात आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार हेस्कॉमकडून होत आहे.
संगमेश्वर नगर एपीएमसी रोड येथे फुटपाथमध्येच जुना ट्रान्स्फॉर्मर आहे. ये- जा करणाऱया नागरिकांना या ट्रान्स्फॉर्मरखालून ये-जा करावी लागते. या ट्रान्स्फॉर्मरमधून अनेक वेळा तेलगळतीही होत असल्यामुळे ती थेट ये-जा करणाऱया नागरिकांच्या अंगावर पडत आहे. त्यामुळे हा ट्रान्स्फॉर्मर इतरत्र हलविण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.