प्रतियुनिट 35 ते 45 पैसे वाढ शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
खाद्यतेल, गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर जनतेला आता वीजदरवाढीचाही शॉक बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक वीज नियंत्रण आयोग (केईआरसी) राज्यात वीजदरवाढीसाठी सरसावले असून 1 एप्रिलपासून प्रतियुनिट सरासरी 35 ते 45 पैसे वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. ही दरवाढ झाल्यास राज्यातील वीज ग्राहकांच्या खिशावरील आर्थिक ताण वाढू शकतो.
राज्यातील वीज वितरण कंपन्या हेस्कॉम, चेस्कॉम, बेस्कॉमसह इतर कंपन्यांनी प्रतियुनिट 1 रुपया 50 पैसे वीजदरवाढ करण्याचा प्रस्ताव केईआरसीकडे सादर केला होता. केईआरसीने दरवाढीबाबत जनतेतून अभिप्राय मागविले आहेत. त्यानुसार प्रतियुनिट 35 ते 45 पैशांनी वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. वीज पुरवठय़ासाठी येणारा खर्च वाढत असल्याने वीज वितरण कंपन्यांनी दरवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे जनतेवर अधिक भार पडणार नाही, याची खबरदारी घेत वीजदरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
केईआरसीने 14 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यंत वीज दरवाढीसंबंधी जनतेतून आक्षेप मागविले आहेत. संघ-संस्था, उद्योजकांनी कोरोना परिस्थितीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीजदरवाढ करू नये, असे निवेदन केईआरसीकडे दिले आहे. मात्र, वीज वितरण कंपन्यांना होणारे नुकसान टाळण्यासाठी दरवाढ अनिवार्य असल्याचे केईआरसीच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
2021 मध्ये वीज वितरण कंपन्यांनी प्रतीयुनिट वीज दरात 1 रुपये 39 पैशांनी वाढ करण्याची मुभा द्यावी, असा प्रस्ताव केईआरसीकडे पाठविला होता. मात्र, सरासरी 30 पैशांनी वीजदरवाढीची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार जून 2021 मध्ये वीजदरवाढ करण्यात आली होती. आता केईआरसीकडून किती वीजदरवाढीला संमती दर्शविण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.