वृत्तसंस्था/ लॉसेन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या (एफआयएच) ऍथलिटस् समिती सदस्यपदी भारताचा आंतरराष्ट्रीय हॉकीपटू पी. आर. श्रीजेशची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आली.
भारतीय हॉकी संघाचा श्रीजेश हा गोलरक्षक असून त्याला आंतरराष्ट्रीय हॉकीचा चांगलाच अनुभव आहे. यापूर्वी त्याने भारतीय हॉकी संघाचे अनेक स्पर्धांमध्ये नेतृत्त्वही केले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये चार नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये भारताच्या श्रीजेशला संधी देण्यात आली आहे. एफआयएच ऍथलिटस् समितीमध्ये आता भारताचा पी. श्रीजेश, पोलंडचा एम. रिबेचा, दक्षिण आफ्रिकेचा मोहम्मद मिया आणि ऑस्ट्रेलियाचा मॅट स्वेन यांचा समावेश आहे. भारतीय संघातील 33 वर्षीय श्रीजेश हा एक अनुभवी आणि ज्येष्ठ हॉकीपटू म्हणून ओळखला जातो.